सावधान ! ‘या’ कारणांमुळे नागपुरात कोरोना झाला अनियंत्रित; धक्कादायक आहेत कारणे

नागपूर शहरात गुरुवारी राज्यातील सर्वाधिक करोना रुग्णांची नोंद करण्यात आली. ३ हजार ७९६ इतके रुग्ण आढळले. पैकी शहरात २ हजार ९१३ आणि ग्रामीणमध्ये ८८० पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

  नागपूर (Nagpur).  शहरात गुरुवारी राज्यातील सर्वाधिक करोना रुग्णांची नोंद करण्यात आली. ३ हजार ७९६ इतके रुग्ण आढळले. पैकी शहरात २ हजार ९१३ आणि ग्रामीणमध्ये ८८० पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत; पण नागपुरात नेमक्या कोणत्या कारणांमुळे कोरोना वाढतोय? याचीही कारणे शोधण्याचा काही तज्ज्ञांनी प्रयत्न केला.  नागपुरातील नागरिकांच्या सवयी कोरोनावाढीसाठी कारणीभूत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे.

  कारणे:

  1) कोरोनाचे गांभीर्य नसणे: नागपुरकरांमध्ये कोरोनाचा प्रादूर्भाव होण्याचे प्रमुख कारण म्हणजे कोरोनाविषयी फारसे गांभीर्य नसणे होय. बहुतेक नागरीक सॅनिटायजर, मास्क वापरणे टाळतात. अस्वच्छता, एकमेकांशी हात मिळविणे, गळाभेट देणे, बोलताना ठराविक अंतर न पाळणे या सवयींमुळे निरोगी व्यक्ती कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आल्यास त्याला कोरोनाची लागण होण्याची शक्यता सर्वाधिक असते.

  2). बाहेरील खाद्यपदार्थ खाण्यावर भर देणे: नागपुरकरांमध्ये आयते तयार केलेले खाद्यपदार्थ विकत घेऊन खाण्यावर जास्त भर देत आहेत. विकेंड पार्टीचे चलनही चांगलेच फोफावले आहे. हाॅटेल्स, रेस्टाॅरेंट, पाणीपुरी सेंटर, चहाच्या टपऱ्यांवर लोकांची गर्दी वाढत आहे. मात्र, खाद्यपदार्थ बनविणारी व्यक्ती कोरोनाबाधित तर नाही ना ! हे जाणून घेण्याची तसदी कोणीही दाखवत नाही. यामुळे कोरोनाची लागण होत आहे.

  3). छुप्या पाटर्या आणि लग्नसमारंभ: प्रशासनाने गर्दी टाळण्यासाठी 50 पेक्षा जास्त नागरिकांना एकत्र येण्यास मनाई केली आहे. त्याचप्रमाणे सार्वजनिक समारंभ आयोजित करण्यावरही प्रतिबंध लावलेला आहे. असे असले तरी घरघुती लग्नसमारंभातही 150 ते 200 पाहुणे सहजच एकत्रित येत आहेत. यात कोणी कोरोना पाॅझिटिव्ह असल्यास कोरोना वाढू लागतो.

  4). नागपुरी खर्रा आणि जागोजागी थुंकण्याची सवय: पानठेले सुरू करण्यास मनपा प्रशासनाने सक्त मनाई केली आहे. तरीही सायंकाळच्या वेळेस गल्लीबोळातील पानठेले बेरोकटोकपणे सुरू असतात. यामधून शेकडो खर्रे सहजपणे विकले जातात. खर्रे खाऊन जागोजागी थुंकणाऱ्यांची नागपुरात काही कमी नाहीच. कोरोना प्रसारासाठी खर्रे खाऊन थुंकणे हे सर्वांत प्रमुख कारण आहे.

  5). सार्वजनिक ठिकाणी वाढणारी गर्दी: नागपुरात संचारबंदी लागू असली तरी दिवसाला आणि सायंकाळी सार्वजनिक ठिकाणी वाढणारी गर्दी हेसुद्धा कोरोना वाढीमागील मुख्य कारण आहे. गर्दीत एक जरी कोरोनाबाधित रुग्ण असल्यास त्यापासून इतरांनाही कोरोनाची लागण होण्याची शक्यता असते.