प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

लॉकडाउन तसेच मोठ्या प्रमाणात लसीकरण होत असताही कोरोनाबाधितांचा आकडा दररोज वाढत चालला आहे. यामुळे संपूर्ण आरोग्य यंत्रणा आणि प्रशासनही हादरले आहे.

  नागपूर (Nagpur).  लॉकडाउन तसेच मोठ्या प्रमाणात लसीकरण होत असताही कोरोनाबाधितांचा आकडा दररोज वाढत चालला आहे. यामुळे संपूर्ण आरोग्य यंत्रणा आणि प्रशासनही हादरले आहे. हा आकडा नेमका कशामुळे वाढत आहे. याचाही शोध घेतला जात आहे. महापालिका आणि खासगी लॅबमध्ये एकाच रुग्णाच्या वारंवार होत असलेल्या चाचण्या आणि नोंदीमुळे पॉझिटिव्हची संख्या फुगल्याचे सांगण्यात येत आहे.

  आरोग्य यंत्रणेसमोर पेच
  नागपूर जिल्ह्यात महिन्याभरापासून संचारबंदी, लॉकडाउन सुरू आहे. अत्यावश्यक सैवा वगळता जवळपास सर्वच बाजारपेठा बंद आहेत. भीतीमुळे प्रत्येक कुटुंब सजग झाल्याचे दिसून येते. व्हिटॅमिन्सच्या गोळ्या, काढे पिणाऱ्यांची संख्या वाढली आहे. मात्र, रुग्णांची संख्या कमी होताना दिसत नाही. त्यामुळे आरोग्य यंत्रणाही पेचात पडली आहे.

  रुग्णांचा उतावीळपणा
  महापालिकेच्यावतीने मोठ्या प्रमाणावर चाचण्या केल्या जात आहेत. मात्र, काही रुग्ण फारच उतावीळ असतात. दर आठवड्यात चाचणी करतात. १४ ते २१ दिवस थांबण्याची तसदी घेत नाहीत. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढल्याचे दिसते.

  पुन्हा पुन्हा होते नोंद
  महापालिकेच्या अहवालात रुग्ण पॉझिटिव्ह की निगेटिव्ह एवढाच उल्लेख असतो. त्यात त्याची सिटी व्हॅल्यू किती याचा उल्लेख नसतो. त्यामुळे अनेक रुग्ण खासगी लॅबमध्ये जातात तसेच काहींना सिटी स्कॅन करण्याचा सल्ला डॉक्टर देतात. त्यात तो पॉझिटिव्ह आढळल्यास त्याची नव्याने नोंद महापालिकेत केली जाते.

  सर्व खासगी रुग्णालयांना पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती देणे महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेला बंधनकारक असते. त्यामुळे एकदा पॉझिटिव्ह म्हणून नोंद झालेल्या रुग्णाची चारदोन दिवसात पुन्हा नव्याने नोंद होते. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांची संख्याही वाढल्याचे दिसते.

  जिल्हाधिकारी म्हणतात, बेड मिळत नसेल तर संपर्क साधा
  महापालिका, शासकीय आरोग्य यंत्रणा आणि खासगी रुग्णालयांमार्फत रुग्णांवर चांगल्या पद्धतीने उपचार केले जात आहेत. मात्र रुग्णांचा आकडा कमी होताना दिसत नाही. त्यामुळे काहीतरी घोळ असावा अशी शंका येते.

  त्यामुळे महापालिकेला आरटीपीसीआर चाचणी अहवालात खासगी रुग्णालयांप्रमाणे रुग्णाची सिटी व्हॅल्यू व इतर सविस्तर माहिती देण्याची व्यवस्था करावी लागणार आहे. याशिवाय एकाच रुग्णाची पॉझिटिव्ह म्हणून वारंवार नोंद होऊ नये याकरिता यंत्रणा अद्ययावत करावी लागेल.