नागपूर जिल्हा परिषदेत भाजपला धक्का; काँग्रेसच्या ९ उमेदवारांचा दणदणीत विजय

नागपूर जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने नेत्रदीपक यश मिळवले. या यशात राज्याचे पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री सुनील केदार यांचे महत्त्वाचे योगदान आहे. केदार यांनी पोटनिवडणूक जाहीर झाल्यापासूनच नियोजनास प्रारंभ केला. प्रचाराच्या काळात जिल्ह्य़ात तळ ठोकून बसले.

  नागपूर (Nagpur) : जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे कट्टर समर्थक आणि जि.प.तील विरोधी पक्षनेते अनिल निधान यांचा पराभव झाला आहे.

  ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने नागपूर जिल्हा परिषदेच्या १६ जागांवर पोटनिवडणूक झाली. काँग्रेसने १० जागांवर उमेदवार दिले होते. त्यापैकी नऊ उमेदवार विजयी झाले. काँग्रेसने आपल्या आधीच्या जागा राखून दोन नवीन जागाही जिंकल्या. याचा भाजपला जबर फटका बसला. त्यांच्या दोन जागा कमी झाल्या. विशेष म्हणजे, माजी मंत्री बावनकुळे यांचे समर्थक आणि भाजपचे जिल्हा परिषदेतील विरोधी पक्षनेते अनिल निधान यांचा पराभव झाला. ही जागा काँग्रेसने जिंकली. हा भाजपला सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.

  नागपूर जिल्हा परिषद काँग्रेसकडे आहे. परंतु १६ जागांवर पोटनिवडणूक होत असल्याने सत्ता समीकरण बदलण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. म्हणून काँग्रेसने ही निवडणूक निकराने लढली. भाजपने चंद्रशेखर बावनकुळे, आमदार गिरीश व्यास आणि आमदार समीर मेघे यांच्याकडे जबाबदारी दिली. मात्र, या नेत्यांचा या निवडणुकीवर फारसा प्रभाव दिसून आला नाही. उलट दोन जागा गमावण्याची वेळ आली. ५८ सदस्यांच्या जिल्हा परिषदेत आता काँग्रेसचे संख्याबळ ३० वरून ३२ वर गेले आहे.

  केदार यांच्या एकहाती प्रचारतंत्राला यश
  नागपूर जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने नेत्रदीपक यश मिळवले. या यशात राज्याचे पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री सुनील केदार यांचे महत्त्वाचे योगदान आहे. केदार यांनी पोटनिवडणूक जाहीर झाल्यापासूनच नियोजनास प्रारंभ केला. प्रचाराच्या काळात जिल्ह्य़ात तळ ठोकून बसले. त्यांच्या सोबतीला जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांनीही जिल्हा पिंजून काढला. काँग्रेस एकजुटीने कामाला लागल्याचे चित्र होते. या निवडणुकीत केदार आणि मुळक यांच्यात चांगला समन्वय दिसून आला. दुसरीकडे भाजपच्या प्रचाराला फार गती नव्हती. प्रचाराच्या ऐन रणधुमाळीत काँग्रेस पक्षातील एका नेत्याने चक्क विरोधी पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार केल्याची चित्रफीत प्रसारित झाली. पण या सर्व बाबींचा पोटनिवडणुकीवर परिणाम होऊ न देण्यात काँग्रेस यशस्वी झाल्याचे दिसून येते.

  फडणवीसांचे नेतृत्व जनतेला मान्य
  ओबीसी आरक्षणावर आलेले सावट आणि राज्यातील एकूण परिस्थिती आम्ही मतदारांसमोर मांडली. पण नागपूर जिल्ह्य़ात पैशांचा, बळाचा आणि धमकावण्याचा प्रकार घडला. प्रशासन, अधिकारी, पोलीस यांनी बघ्याची भूमिका घेतली. त्यामुळे आम्हाला नुकसान झाले. परंतु पोटनिवडणुकीत राज्यात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व जनतेला मान्य आहे, असा दावाही त्यांनी केला.
  — गिरीश व्यास, प्रवक्ते, भाजप

  भाजपवर लोकांची नाराजी
  भाजपने ही निवडणुक लादल्याचे मतदारांना कळून चुकले. त्याचा परिणाम निकालात दिसून आला. भाजप ओबीसीचा मुद्दा घेऊन जिल्ह्य़ात आणि राज्यभर फिरत होती. परंतु, भाजपच्या त्यावेळेच्या सरकारने घेतलेल्या चुकीच्या निर्णयामुळे निवडणूक लादली गेली, हे जनतेला चांगले कळत होते. त्यामुळे भाजपवर लोकांची नाराजी होती.
  — राजेंद्र मुळक, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस