हेल्पलाइनवर कॉल केला; खात्यातून ७० हजार रुपयांवर सायबर चोरांचा डल्ला

गायकवाड यांनी १,४२७ रुपयांचा ऑनलाइन व्यवहार केला. हा व्यवहार करताना पैसे चुकीच्या खात्यात गेले. ही चूक दुरुस्त करण्यासाठी त्यांनी बँकेच्या पासबूकवर नमूद असलेल्या १८००४२५३८०० या टोल फ्री क्रमांकावर कॉल केला. संभाषण पूर्ण झाल्यानंतर त्यांना ०८३८८९५८३३० या क्रमांकावरून कॉल आला.

  नागपूर (Nagpur) : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (State Bank of India) (एसबीआय) (SBI) टोल फ्री क्रमांकावर (toll free number of SBI) कॉल करणे एका खातेधारकाला महागात पडले आहे. खातेधारकाने हेल्पलाइनवर कॉल केला असता दुसऱ्या क्रमांकावरून संपर्क साधण्यात आला. या संवादातून संबंधित खातेधारकाच्या खात्याची संपूर्ण माहिती मिळवित सत्तर हजार रुपयांनी गंडविले. प्रशांत गायकवाड असे खातेधारकाचे नाव आहे. त्यांचे एसबीआयच्या उदयनगर शाखेत खाते आहे.

  गायकवाड यांनी १,४२७ रुपयांचा ऑनलाइन व्यवहार केला. हा व्यवहार करताना पैसे चुकीच्या खात्यात गेले. ही चूक दुरुस्त करण्यासाठी त्यांनी बँकेच्या पासबूकवर नमूद असलेल्या १८००४२५३८०० या टोल फ्री क्रमांकावर कॉल केला. संभाषण पूर्ण झाल्यानंतर त्यांना ०८३८८९५८३३० या क्रमांकावरून कॉल आला. हा क्रमांक ट्रू कॉलर अॅपवर एसबीआय स्टेट बँक ऑफ इंडिया, वेस्ट बेंगॉल नावाने रजिस्टर होता.

  या नंबरवरून बोलणाऱ्या व्यक्तीने गायकवाड यांना एनीडेस्क डाउनलोड करायला लावले आणि एटीएम क्रमांकासह इतर तपशील ऑनलाइन फॉमर्ममध्ये भरायला लावला. ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होत नाही तोच २० हजार, २५ हजार आणि २५ हजार असे तीन टप्प्यात सत्तर हजार रुपये खात्यातून वळते करण्यात आले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच गायकवाड यांनी सायबर सेलकडे तक्रार केली.

  यासंदर्भात स्टेट बँक ऑफ इंडिया बँक कर्मचारी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अरविंद भुमराळकर म्हणाले, अशा प्रकारची ही पहिलीच घटना दिसते आहे. सायबर सेलच्या माध्यमातूनच संबंधित खातेधारकाला मदत होऊ शकेल. सायबर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक बागुल म्हणाले, एनीडेस्क या अॅपचा उपयोग स्क्रीन शेअरिंगसाठी होतो. मात्र आता या अॅपच्या माध्यमातून अनेक ऑनलाइन आर्थिक गुन्हे घडत आहेत. खातेधारकांनी असे अॅप डाउनलोड करू नये. खातेधारकाची चूक नसल्यास पूर्ण रक्कम बँकेने परत द्यावी, असे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे निर्देश असल्याची माहितीही त्यांनी दिली.

  ‘टोल फ्री’ क्रमांकावर चोरांची नजर (Thieves keep an eye on toll free numbers)
  खातेधारक गायकवाड यांनी एसबीआयच्या टोल फ्री क्रमांकावर कॉल केला. तो क्रमांक लीक झाल्यामुळेच त्यांना दुसऱ्या क्रमांकावरून कॉल आला. याचाच अर्थ बँकेच्या टोल फ्री क्रमांकावर येणाऱ्या प्रत्येक कॉलचा डेटा लीक होतोय का, असा सवाल या घटनेमुळे उपस्थित झाला आहे.