गांजा smugglerला १०० किलो गांजासह अटक; तस्करीसाठी महागड्या कारचा वापर

पोलिसांनी कारची झडती घेतली तेव्हा त्यात 99 किलो 330 ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला. जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत 15 लाख इतकी आहे. कारसह सुमारे 24 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

  नागपूर (Nagpur) : विशाखापट्टणम येथून गांजाची मोठी खेप घेऊन दिल्लीसाठी निघालेली महागडी कार नागपूर पोलिसांनी ताब्यात घेतली. तपासणीत या महागड्या कारमध्ये तब्बल 100 किलो गांजा आढळून आला. या गांज्याची किंमत 15 लाख रुपये आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.

  जावेद अहमद नईम अहमद असं आरोपीचं नाव आहे. तो दिल्लीचा रहिवासी असल्याचं तपासात स्पष्ट झालं आहे. अटक आरोपीने दिलेल्या माहितीच्या आधारे गांजा तस्करी प्रकरणातील मुख्य आरोपीचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. पोलिसांच्या गुप्त बातमीदारांनी दिलेल्या सूचनेच्या आधारे बेलतरोडी पोलिसांनी जबलपूर बायपास आऊटर रिंग रोड जवळील वेळाहरी गावालगत सापळा रचला. पोलिसांना ज्या गाडीची माहिती समजली होती ती गाडी दिसताच पोलीस पथकाने शिताफीने ती कार थांबवली.

  15 लाख रुपयांच्या गांज्यासह 24 लाखांचा मुद्देमाल जप्त
  पोलिसांनी कारची झडती घेतली तेव्हा त्यात 99 किलो 330 ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला. जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत 15 लाख इतकी आहे. कारसह सुमारे 24 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. बेलतरोडी पोलिसांनी जावेद अहमद नईम अहमद नावाच्या आरोपीला अटक केली आहे. त्याच्यावर एन.डी.पी.एस कायदा 1985 अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे, अशी माहिती बेलतरोडी पोलीस निरीक्षक चंद्रकांत यादव यांनी दिली.

  गांजाची तस्करी करण्यासाठी महागड्या कारचा उपयोग
  गेल्या दोन वर्षापासून गांजा तस्करांकडून गांजाची तस्करी करण्यासाठी महागड्या कारचा उपयोग सुरू आहे. यापूर्वी प्रवासी ट्रेनच्या स्लीपर कोचमधून मोठ्या प्रमाणात तस्करी केली जायची. मात्र, रेल्वे सुरक्षा पथकाने अनेक वेळा कारवाई करून मोठा मुद्देमाल जप्त केल्याने तस्करांनी कारचा उपयोग सुरू केला आहे. गांजा तस्करीचा मास्टरमाईंड हा दिल्लीच्या सुलतानपुरीचा गोलू नावाचा आरोपी असल्याची माहिती पुढे आली आहे. पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.