छत्तीसगडमधल्या बड्या अधिकाऱ्याची नागपुरात आत्महत्या, लॉजवर आढळला संशयास्पद मृतदेह

नागपूरमधील लॉजवर राजेश श्रीवास्तव यांचा मृतदेह आढळल्याची माहिती मिळाल्यानंतर रायपूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. राजेश श्रीवास्तव यांनी आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करुन तपास सुरु केला आहे.

    नागपूर : छत्तीसगडमधल्या बड्या अधिकाऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपूरमधील लॉजवर त्यांचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोषागार विभागात कार्यरत सहसंचालक राजेश श्रीवास्तव यांचा मृतदेह सीताबर्डी भागातील लॉजमध्ये संशयास्पद अवस्थेत आढळला. श्रीवास्तव यांनी आत्महत्या केली की त्यांचा घातपात झाला, याचा शोध पोलीस घेत आहेत.

    नागपूरमधील लॉजवर राजेश श्रीवास्तव यांचा मृतदेह आढळल्याची माहिती मिळाल्यानंतर रायपूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. राजेश श्रीवास्तव यांनी आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करुन तपास सुरु केला आहे. छत्तीसगडच्या कोषागार विभागात सहसंचालकपदी कार्यरत असलेले राजेश श्रीवास्तव १ मार्चपासून बेपत्ता असल्याचं सांगितलं जात आहे.

    राजेश श्रीवास्तव यांचा मृतदेह आढळल्यामुळे छत्तीसगढमध्ये एकच खळबळ उडाली आहे. श्रीवास्तव एक मार्चपासून मंत्रालयातून बेपत्ता झाले होते. तेव्हापासून पोलीस त्यांचा शोध घेत होते. गेल्या आठ महिन्यांपासून वेतन थकित असल्यामुळे राजेश श्रीवास्तव व्यथित असल्याचं त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितलं. परंतु नागूपरमधील सीताबर्डी भागातील लॉजमध्ये १०४ क्रमांकाच्या खोलीत ते राहत होते. त्यांनी बराच वेळ दरवाजा न उघडल्यामुळे लॉजमधील कर्मचाऱ्यांनी दरवाजा तोडला. त्यावेळी ते बेडवर मृतावस्थेत आढळले. दरम्यान, पोलिसांनी त्यांचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला असून पुढील चौकशी सुरू करण्यात आली आहे.