काँग्रेस नेत्याचा लेटर बॉम्ब, मंत्री सुनील केदारांवर 210 कोटी बुडवल्याचा आरोप, मुख्यमंत्र्यांना लिहिले पत्र

महाविकास आघाडी सरकारमध्य सर्व काही सुरळीत सुरू असताना आता काँग्रेसचे नेते आशिष देशमुख यांनी लेटर बॉम्ब टाकून एकच खळबळ उडवली आहे. आशिष देशमुख यांनी  क्रीडामंत्री सुनील केदार यांच्यावर बँकेचे 150 कोटी रुपये बुडवल्याचा गंभीर आरोप केला आहे.

  नागपूर : महाविकास आघाडी सरकारमध्य सर्व काही सुरळीत सुरू असताना आता काँग्रेसचे नेते आशिष देशमुख यांनी लेटर बॉम्ब टाकून एकच खळबळ उडवली आहे. आशिष देशमुख यांनी  क्रीडामंत्री सुनील केदार यांच्यावर बँकेचे 150 कोटी रुपये बुडवल्याचा गंभीर आरोप केला आहे.

  दरम्यान याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून सुनील केदार यांना मंत्रिमंडळातून बडतर्क करण्याची मागणी केली आहे. या पत्रामुळे काँग्रेसमधील वाद चव्हाट्यावर आले आहे. आशिष देशमुख यांनी एक पत्र प्रसिद्ध केले आहे. या पत्रात त्यांनी सुनील केदार यांनी नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत केलेला भ्रष्टाचार व त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमीचा मुद्दा उपस्थित केला आहे.

  देशमुख यांनी नेमका काय आरोप केला?

  2002 मध्ये सुनील केदार यांनी नागपूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष असताना त्यांनी बँकेचे १५० कोटी रुपये खासगी दलालांमार्फत सरकारी रोख्यांमध्ये गुंतवली आणि पूर्ण रक्कम गमवावी लागली. या दलाल कंपन्या सुनील केदार यांनी संगनमताने ही रक्कम सरकारी रोखे विकत घेण्यासाठी परस्पर दिली होती. या दलालांनी त्या संपूर्ण रक्कमेचा अपहार करून बँकेला ना रोखे दिले ना पैसे परत दिले व नागपूर जिल्हा बँकेचे १५० कोटीचे नुकसान झाले, असा आरोप देशमुख यांनी केला.

  दरम्यान या प्रकरणी केदार आणि इतर १० जणांविरोधात खटला कोर्टात सुरू आहे. सुनावणी अंतिम टप्पामध्ये आहे. याठिकाणी सुनील केदार यांनी केवळ नागपूर जिल्हा बँकेचे १५० कोटींचे नुकसान केले नसून २००२ साली त्यांचे मित्र शरद देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या वर्धा बँकेत सुद्धा ३० कोटी रुपये या कंपन्यांमध्ये गुंतवण्यासाठी दबाव टाकला होता. असाच प्रकार त्यांनी उस्मानाबाद जिल्हा बँकेचे अध्यक्ष पवनराजे निंबाळकर यांच्या बाबतीत केला होता. त्यांनी राज्यातील एकूण ३ बँकेचे २१० कोटींचे नुकसान केले आहे, असा गंभीर आरोप देशमुख यांनी केला. हे सगळे गैरप्रकार झाले असताना सुनील केदार यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेऊन कायद्याची पळवाट शोधली आणि खटला प्रलंबित ठेवला. गेल्या १९ वर्षात ते सावनेर मतदारसंघातून चार वेळा आमदार निवडून आले आणि आता मंत्रिमंडळात आहे. ही राज्यासाठी लाजीरवाणी बाब आहे, असंही देशमुख म्हणाले.

  तसेचं, सुनील केदार यांचा पूर्वइतिहास हा नेहमीच गुन्हेगारीचा राहिलेला आहे. त्यामुळे अशा चारित्र्यहीन व्यक्ती राज्याच्या मंत्रिमंडळात राहणे खरेतर महाराष्ट्रासाठी एक लांच्छनास्पद आहे म्हणून केदार यांना ताबडतोब मंत्रिमंडळातून बरखास्त करावे आणि त्यांच्याविरोधात नागपूर कोर्टात खटला दाखल करावा, अशी विनंती देशमुख यांनी केली.