विदर्भात यंदा ३२ लाख हेक्टरवर पेरणीचे नियोजन  – कापूस बियाण्यांची विक्री मंद

नागपूर : विदर्भात यंदा ३२ लाख हेक्टरवर पेरणीचे नियोजन करण्यात आले असून त्या अनुषंगाने कृषी विभागाने बियाण्यांची मागणी नोंदविली आहे. सोयाबीन बियाणे कमी पडू नयेत म्हणून बीटी कापसाचे पॅकेट पोहोचले आहेत.

नागपूर : विदर्भात यंदा ३२ लाख हेक्टरवर पेरणीचे नियोजन करण्यात आले असून त्या अनुषंगाने कृषी विभागाने बियाण्यांची मागणी नोंदविली आहे. सोयाबीन बियाणे कमी पडू नयेत म्हणून बीटी कापसाचे पॅकेट पोहोचले आहेत. मात्र कापूस बियाण्यांची विक्री मंदगतीने होत आहे. मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्यामुळे बियाणे बाजारात शेतकरी दिसून येत आहे. विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशिम या जिल्ह्यांसाठी २ लाख ४३ हजार ४५२ क्विंटल सोयाबीन बियाणे बाजारात उपलब्ध झाले आहे. सध्याच्या घडीला सोयाबीनची उचलही अल्प असून तूर २०,३४० क्विंटल, मूग १३,३६७ क्विंटल, उडीद २,१०९ तर ज्वारीचे बियाणे ३,९०३ क्विंटल उपलब्ध झाले असल्याची माहिती कृषी विक्रेत्यांनी दिली आहे. मुख्यत: कोरोनामुळे यावर्षी बाजारात बियाणे पोहोचण्यास विलंब झाला आहे. विशेषकरून काही खासगी कंपन्यांकडून कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी बोलावलेले बियाणे, खते घेऊन येण्यास ट्रकचालकांकडून विलंब होत आहे. मात्र काही शहरातील दुकानांत बियाणे पोहोचले असल्याचा दावा कृषी विभागाने केला आहे.

बाजारात खरेदीसाठी गर्दी होऊ नयेत म्हणून कृषी विभागाने ‘सोशल डिस्टन्स’कडे विशेष लक्ष दिले आहे. काही जिल्ह्यात शेतकरी बचत गटाच्या माध्यमातून खते, बियाणे, कीटकनाशके शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचविण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. याच माध्यमातून काही ठिकाणी बियाणे पुरवठा करण्यात येत आहे. नागपूर जिल्ह्यात या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वास कृषी विभागाने व्यक्त केला आहे.