नागपूर बनतंय क्रिमीनल हब, दर महिन्याला 18 महिला अत्याचार पीडित

नागपुरातील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहिती अधिकाराअंतर्गत नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे विचारणा केली होती. प्राप्त झालेल्या माहितीनुसार महिला अत्याचारांचे 2019 मध्ये 136 (दर महिन्याला 11), 2020 मध्ये 172 (दर महिन्याला 14) गुन्हे नोंदविले गेले. 2021 मध्ये ऑगस्ट महिन्यात 149 गुन्हे (दर महिन्याला 18) गुन्हे नोंदविण्यात आले.

    नागपूर : मागील काही महिन्यांपासून महिला अत्याचाराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलेला असताना नागपुरातील महिलांसंदर्भातील गुन्ह्यांमध्ये या वर्षी वाढ दिसून आली आहे. 2019 आणि 2020 च्या तुलनेत 2021 मध्ये एकूण गुन्ह्यांची संख्या वाढली आहे. विशेषत: महिला अत्याचारांचे वाढलेले प्रमाण चिंतेची बाब आहे. ऑगस्ट महिन्यापर्यंत दर महिन्याला शहरात 110 गुन्हे दाखल झाले आहेत. यात महिला अत्याचारांच्या गुन्ह्यांची संख्या महिन्याला 18 इतकी आहे. माहिती अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.

    उपराजधानीत करोनाची पहिली लाट मार्च २०२० मध्ये सुरू झाली. त्यानंतर प्रथम काही महिने कडक टाळेबंदी होती. त्यानंतर हळूहळू टाळेबंदी शिथिल होत असली तरी कडक निर्बंध होते. त्यामुळे पूर्वीच्या तुलनेत नागरिक कमी प्रमाणात घराबाहेर होते. त्यानंतरही उपराजधानीत २०१९ या वर्षाच्या तुलनेत करोना विषाणूचे संक्रमण असलेल्या २०२० आणि २०२१ ऑगस्ट महिन्यापर्यंत महिला तस्करी, बलात्कार, बाललैंगिक गुन्ह्यामध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे. २०१९ मध्ये उपराजधानीत महिला तस्करीचे १८, बलात्काराचे १३६, बाललैंगिक अत्याचार पोक्सोचे २०० गुन्हे दाखल होते. २०२० मध्ये त्यात वाढ होऊन ३३ महिला तस्करी, १७२ बलात्कार, २३८ पोक्सोचे गुन्हे नोंदवले गेले.