८५ वर्षीय RSS चे स्वयंसेवक असलेल्या आजोबांनी खरोखर कोरोना रुग्णासाठी बेड त्याग केला का? जाणून घ्या सत्य

एकीकडे सोशल मीडियावर नारायण दाभाडकर यांच्याबद्दल पोस्ट व्हायरल होत असताना दुसरीकडे एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. यामध्ये नारायण दाभाडकर यांच्याबद्दल करण्यात आलेला दावा खोटा असल्याचं सांगितलं जात आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये पुणे शहरातील सामाजिक कार्यकर्ते शिवराम ठवरे नागपूरच्या इंदिरा गांधी रुग्णालयाचे अधीक्षक अजय प्रसाद यांच्यासोबत संवाद साधताना ऐकू येत आहे.

    नागपूर : सध्या सोशल मीडियावर नागपूरमधील ८५ वर्षीय RSS चे स्वयंसेवक असलेल्या आजोबांनी एका तरुणांसाठी बेड त्याग केल्याची पोस्ट मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. नारायणराव दाभाडकर असे या आजोबांचे नाव असून बेडचा त्याग केल्यावर त्यांचे अवघ्या तीन दिवसांत कोरोनामुळे राहत्या घरी निधन झालं. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी ट्विट करत नारायणराव दाभाडकर यांनी दुसऱ्या रुग्णासाठी बेड नाकारला अन् मृत्यूला कवटाळलं अशी माहिती पोस्टमध्ये दिली आहे. यानंतर सोशल मीडियावर अनेकजण नारायण दाभाडकर यांचा फोटो शेअर करत कौतुक करत आहेत.

    शिवराज सिंग चौहान यांचं ट्विट ?
    शिवराज सिंग चौहान यांनी नारायण दाभाडकर यांचा फोटो पोस्ट केला असून लिहिलं आहे की, “मी ८५ वर्षाचा झालो आहे. संपूर्ण आयुष्य पाहिलं आहे, पण जर त्या महिलेच्या पतीचा मृत्यू झाला तर तिची मुलं अनाथ होतील. यामुळे त्या व्यक्तीचे प्राण वाचवणं माझं कर्तव्य आहे” असं सांगत कोरोनाबाधित आरएसएस स्वयंसेवक नारायणजींनी आपला बेड त्या रुग्णाला दिला”.पुढे त्यांनी म्हटलं आहे की, “दुसऱ्या व्यक्तीच्या जीवाचं रक्षण करताना नारायणजी तीन दिवसांमध्ये जग सोडून गेले. समाज आणि राष्ट्राचे खरे सेवक असाच त्याग करतात. आपल्या सेवेला सलाम!, तुम्ही समाजासाठी प्रेरणादायी आहात”.

    व्हायरल का होत आहे आजोबांबाबतची पोस्ट?

    सध्या जी पोस्ट व्हायरल होत आहे ती पुढील प्रमाणे- सावित्री विहार, वर्धा रोड, नागपूर येथील रहिवासी असलेले नारायणराव दाभाडकर मोदी नंबर ३, सीताबर्डी येथील शाखेचे स्वयंसेवक. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली. त्यांची मुलगी आसावरी कोठीवान यांनी काही दिवस प्रयत्न केल्यानंतर शहरातील इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयामध्ये खाटेची व्यवस्था झाली. रुग्णालयात आणल्यानंतर त्यांना श्‍वास घेण्यासाठी खूप त्रास होत होता. मात्र, रुग्णालयात दाखल करण्याची औपचारिकता पूर्ण करीत असताना त्यांचे लक्ष एका रडणाऱ्या महिलेकडे गेले. विनवणी करीत ती आपल्या कोरोनाबाधित पतीला खाट मिळावी म्हणून टाहो फोडत होती. तिच्या ४० वर्षीय पतीला ताबडतोब ऑक्सिजन मिळणे गरजेचे होते. नारायण दाभाडकर यांनी वेळ न घालवता आपल्याला मिळालेली खाट त्या गरजू व्यक्तीला देण्याची विनंती तेथील परिचारिकेला केली. मी माझे जीवन जगलो आहे. खाट उपलब्ध असल्यास या महिलेच्या पतीला उपलब्ध करून द्यावी. त्यांच्या परिवाराला त्यांची गरज आहे असेही ते म्हणाले. नारायण दाभाडकर यांनी घेतलेल्या निर्णयावर त्यांच्या जावयांनी आणि डॉक्टरांनी त्यांची समजूत काढायचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी आपल्या लेकीला फोन लावत घरी येत असल्याची माहिती दिली. रुग्णालयाने हमीपत्रावर स्वाक्षरी घेत त्या रुग्णाला खाट दिली. तीन दिवसांनंतर नारायण दाभाडकर यांचे निधन झाले. शासनाच्या सांख्यिकी विभागाचे ते माजी कर्मचारी होते.

    व्हायरल पोस्ट सत्य का असत्य?

    एकीकडे सोशल मीडियावर नारायण दाभाडकर यांच्याबद्दल पोस्ट व्हायरल होत असताना दुसरीकडे एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. यामध्ये नारायण दाभाडकर यांच्याबद्दल करण्यात आलेला दावा खोटा असल्याचं सांगितलं जात आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये पुणे शहरातील सामाजिक कार्यकर्ते शिवराम ठवरे नागपूरच्या इंदिरा गांधी रुग्णालयाचे अधीक्षक अजय प्रसाद यांच्यासोबत संवाद साधताना ऐकू येत आहे.

     

    ऑडिओ क्लिपलमधील संवाद

    शिवराम ठवरे – गुड मॉर्निंग सर, मी पुण्याहून बोलतोय….तुमच्या मेडिकल इन्सिट्यूटच्या नावाने नारायण दाभाडकर यांच्यासंदर्भात एक पोस्ट व्हायरल होत आहे.

    अजय प्रसाद – एक तर अशी पद्धत आपल्या मेडिकल हॉस्पिटलमध्ये नाही. दुसरी गोष्ट म्हणजे या नावाचा रुग्ण आमच्याकडे दाखल झालेला नाही. तिसरं म्हणजे एका पेपरमध्ये आलं आहे त्याप्रमाणे नागपूर पालिकेच्या एका रुग्णालयाच्या ओपीडीमध्ये हा रुग्ण गेला होता असं सांगण्यात आलं आहे.

    शिवराम ठवरे – म्हणजे तुमच्या इंदिरा गांधी रुग्णालयात हे झालेलं नाही.

    अजय प्रसाद – आमच्याकडे असं नाही, पण पेशंटकडून बेड घेण्याची अशी पद्धत कुठेच नाही. आम्ही कंफर्म केलं असून अशा नावाचा कोणताही रुग्ण आमच्याकडे नव्हता.

    शिवराम ठवरे – नागपूर पालिकेच्या साईटवर या हॉस्पिटलची माहिती मिळेल ना म्हणजे…

    अजय प्रसाद – हो तिथे मिळून जाईल…पेपरमध्येही सविस्तर माहिती आहे. आम्हीदेखील आज सकाळी पाहिलं.

    शिवराम ठवरे – अशा पद्धतीने करोना रुग्ण कसा काय घरी जाऊ शकतो म्हणून आम्हीदेखील गोंधळून गेलो होतो. बाहेर जरी धडपड सुरु असली तरी आतमध्ये दाखल रुग्णाला कसं कळणार?

    अजय प्रसाद – हो बरोबर…अशी पद्धतच नाही.

    सोशल मीडियावर या प्रकरणी उलटसुलट चर्चा होत असून आत्तापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार दाभाडकरांनी करोना रुग्णासाठी बेडचा त्याग केल्याचं दिसून येत नाही.