प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

महिला पोलिसांना सध्या दिवस व रात्रपाळीला १२ तास कर्तव्य बजावावे लागते. यादरम्यान महिला कर्मचाऱ्यांना शासकीय कर्तव्यासह कौटुंबिक जबाबदारीही पार पाडावी लागते. कर्तव्य व जबाबदारीचा ताळमेळ साधण्यासाठी त्यांची तारेवरची कसरत होते.

    नागपूर (Nagpur) : शहर पोलिस दलात (Nagpur city police) कार्यरत महिला पोलिसांना (Women police) आता केवळ आठ तासच कर्तव्य बजावावे लागणार आहे. नागपूर शहर पोलिस आयुक्त (Nagpur City Police Commissioner) अमितेशकुमार (Amitesh Kumar) यांनी शनिवारी याबाबत निर्णय जाहीर केला. त्यांच्या या निर्णयाचे महिला पोलिसांनी स्वागत केले असून, कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

    महिला पोलिसांना सध्या दिवस व रात्रपाळीला १२ तास कर्तव्य बजावावे लागते. यादरम्यान महिला कर्मचाऱ्यांना शासकीय कर्तव्यासह कौटुंबिक जबाबदारीही पार पाडावी लागते. कर्तव्य व जबाबदारीचा ताळमेळ साधण्यासाठी त्यांची तारेवरची कसरत होते. पोलिस आयुक्तालयांतर्गत कार्यरत महिला कर्मचाऱ्यांना आठ तास ड्युटी देण्यात यावी, अशी विनंती महिला कर्मचाऱ्यांनी पोलिस आयुक्तांकडे केली होती. महिला पोलिसांच्या विनंतीला मान देत पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी हा निर्णय घेतला.

    कर्तव्यासह कौटुंबिक जबाबदारी उत्तमप्रकारे पार पडावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. कायदा व सुव्यवस्था, महत्त्वाच्या प्रसंगी तसेच सण व उत्सावादरम्यान लावण्यात येणाऱ्या बंदोबस्तासाठी महिला पोलिसांची आवश्यकता असल्यास वरिष्ठ पोलिस निरीक्षकांनी संबंधित पोलिस उपायुक्तांकडून याबाबतची परवानगी घेणे आवश्यक असेल. हा निर्णय प्रायोगिक तत्त्वावर असून, तो पुढील आदेशापर्यंत कायम राहणार आहे. तसेच या निर्णयाची अंमलबजावणी होत आहे किंवा नाही याकडे पोलिस उपायुक्तांनी लक्ष ठेवावे, असेही आयुक्तांनी जारी केलेल्या आदेशात नमूद केले आहे.

    संख्या अशी…
    एकूण : १,५१०
    मुख्यालय : ५६७
    गुन्हेशाखा : २३
    भरोसा सेल : १०
    आर्थिक गुन्हेशाखा : ८