वीज कनेक्शन कापण्यासाठी गेलेल्या महावितरण कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला

हल्ला करणाऱ्या कुटुंबाने 5 हजार 155 रुपयांचे वीजबिल थकवलं होतं. त्यामुळे त्यांच्याविरोधात विजेचं कनेक्शन कापण्याची कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे संबंधित कारवाईसाठी महावितरणाचं पथक गेलं असताना कुटुंबातील काही सदस्यांनी आधी महावितरणाच्या पथकासोबत शाब्दिक वाद घातला.

  नागपूर (Nagpur) : सर्वसामान्यांच्या घरात वीज पोहोचवण्यासाठी महावितरण कर्मचाऱ्यांचे (MSEDCL employees) योगदान खूप मोठं आहे; पण काही नागरिकांना या गोष्टींचं गांभीर्य दिसत नाही. नागपुरात एका कुटुंबाने तर वीज कनेक्शन तोडलं म्हणून महावितरण कर्मचाऱ्यावर (MSEDCL employee) जीवघेणा हल्ला (attack) केला. या हल्ल्यात महावितरण कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे.

  जखमी कर्मचाऱ्यावर उपचार सुरु (Injured staff begin treatment)
  संबंधित घटना ही नागपूरच्या भेंडे ले आऊट परिसरातील इंद्रप्रस्थ नगरमध्ये घडली. वीजबिल थकवणाऱ्या कुटुंबाचे वीज कनेक्शन कापण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्यावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात महावितरणचे तंत्रज्ञ सुखदेव केराम हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तिथे त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. या हल्ल्यात सुखदेव प्रचंड रक्तबंबाळ झाले होते.

  महावितरणाच्या पथकासोबत आधी हुज्जत, नंतर हल्ला
  हल्ला करणाऱ्या कुटुंबाने 5 हजार 155 रुपयांचे वीजबिल थकवलं होतं. त्यामुळे त्यांच्याविरोधात विजेचं कनेक्शन कापण्याची कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे संबंधित कारवाईसाठी महावितरणाचं पथक गेलं असताना कुटुंबातील काही सदस्यांनी आधी महावितरणाच्या पथकासोबत शाब्दिक वाद घातला. त्यानंतर त्यांनी थेट केराम यांच्या डोक्यात लोखंडी हत्याराने प्रहार करत गंभीर जखमी केले.

  आरोपींविरोधात गुन्हा दाखल
  संबंधित घटनेची माहिती वाऱ्यासारखी शहरात पसरली. काही महावितरण कर्मचारी आणि संघटनांचे प्रतिनिधी सोनेगाव पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्यांनी संबंधित कुटुंबावर कारवाई करण्याची मागणी केली. पोलिसांनी सर्वांची बाजू ऐकून घेत कारवाईचं आश्वासन दिलं. तसेच आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.