काँग्रेसचे माजी नगरसेवक देवा उसरे यांची निर्घृण हत्या

नागपूर : नागपूर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक  देवा उसरे (वय ५२) यांची  रविवारी सकाळी  निर्घृण हत्या (Murder) करण्यात आली आहे. उसरे आज सकाळी फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडले होते. यावेळी भारत टॉकीजजवळ त्यांच्यावर दोन अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला. या हल्ल्यामागचे नेमके कारण समजू शकलेले नाही. मात्र, प्रॉपर्टीच्या वादातून त्यांची हत्या करण्यात आली असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

पोलिसांच्या दिलेल्या माहितीनुसार , देवा यांच्यावर हल्ला केल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले. या घटनेमुळे देवा उसरे रक्ताच्या थारोळ्यात पडले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर देवा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, तेथे त्यांना मृत घोषीत करण्यात आलं. देवा यांच्यामागे पत्नी, दोन मुले, दोन भाऊ असा परिवार आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस करत आहेत.कॉंग्रेस पक्षाकडून उसरे दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते.