माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या निवासस्थानी सक्तवसुली संचालनालयाचे पुन्हा छापे

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मालमत्ता जप्तीच्या कारवाईनंतर सक्तवसुली संचलनालयाने नागपूर जिल्ह्यात काटोल आणि नरखेड तालुक्यातील वडविहिरा येथे अनिल देशमुख यांच्या वडिलोपार्जित घरांमध्ये शोध मोहीम सुरु केली आहे. रविवारी सकाळपासूनच अंमलबजावणी संचलनालयाने छापेमारी सुरु केली आहे.

  नागपूर : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मालमत्ता जप्तीच्या कारवाईनंतर सक्तवसुली संचलनालयाने नागपूर जिल्ह्यात काटोल आणि नरखेड तालुक्यातील वडविहिरा येथे अनिल देशमुख यांच्या वडिलोपार्जित घरांमध्ये शोध मोहीम सुरु केली आहे. रविवारी सकाळपासूनच अंमलबजावणी संचलनालयाने छापेमारी सुरु केली आहे.

  मालमत्तेची सध्याची किंमत ३५० कोटी

  अनिल देशमुख यांची ४ कोटी २० लाखांची मालमत्ता १६ जुलै रोजी जप्त केल्यानंतर ईडीने जप्त केलेल्या मालमत्तांची सध्याची किंमत ३५० कोटी रुपये असल्याची नवी माहिती दिली. वरळी येथील एक फ्लॅट (खरेदी किंमत १ कोटी ५४ लाख रुपये) तसेच रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील धुमत गावातील ८ एकर ३० गुंठे जमीन जप्त केली आहे. ईडीने या मालमत्तेची किंमत ४ कोटी २० लाख असल्याचे म्हटले होते.मात्र ही खरेदी किंमत असून या मालमत्तेची सध्याच्या बाजारभावानुसार किंमत तब्बल ३५० कोटी रुपयांच्या आसपास आहे.

  सर्वोच्च न्यायालयात धाव

  अनिल देशमुख यांच्यावर उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचे आदेश दिल्यांनतर हा तपास ईडी कडे देण्यात आला त्यात त्याना तीनदा चौकशीसाठी हजर राहण्याबाबत समन्स बजावले. तर त्यांच्या पत्नी आरती आणि मुलगा ऋषिकेश याला एकदा समन्स बजावण्यात आले होते. मात्र, दोघांनी चौकशीसाठी हजर न राहता सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

  हवालाच्या माध्यमातून रक्कम वळविल्याचा संशय

  निलंबित पोलीस निरीक्षक सचिन वाझे याला ४ कोटी ७० लाख रुपये दिल्याचा जबाब काही बार मालकांनी दिल्यानंतर हीच रक्कम अनिल देशमुख यांनी हवालाच्या माध्यमातून अन्यत्र वळविल्याचा ईडीच्या अधिकाऱ्यांना संशय आहे. त्यामुळेच ईडीच्या आधिकाऱ्यांनी खरेदी किंमत असलेली ४ कोटी २० लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. मात्र  जप्त केलेल्या या मालमत्तेची प्रत्यक्षात बाजार भावाने किंमत ३५० कोटी रुपये आहे