पदवी प्रवेशासाठी मुदतवाढ देऊनही नागपूर विद्यापीठाच्या चाळीस टक्के जागा रिक्त

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी दोन दिवस मुदतवाढ देऊनही चाळीस टक्के जागा रिक्त राहिल्याचे समोर आले आहे . आज प्रवेशाचा अंतिम दिवस होता. विशेष म्हणजे इतक्या जागा रिक्त असतानाही प्रवेशासाठी कुठल्याही प्रकारची मुदतवाढ देण्यास विद्यापीठाने नकार दिला आहे.

विद्यापीठाच्या पदवी प्रवेशासाठी १७ जुलैपासून सुरुवात झाली. कोरोनामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले नसल्याची बाब समोर आल्याने विद्यापीठाने दोन दिवस म्हणजे ३० ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली. विद्यापीठाच्या ऑनलाइन पदवी प्रवेश प्रक्रियेत यंदा केवळ ६० टक्केच प्रवेश नोंदविण्यात आले आहे. १ लाख ८ हजार ४०६ विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर नोंदणी केली.रिक्त जागांबाबत महाविद्यालयांच्या प्राचार्यांना विचारणा केली असता, त्यांनी याला दुजोरा देत विद्यार्थी प्रवेशासाठी येतच नसल्याचे स्पष्ट केले.

विद्यापीठामधील शाखानिहाय जागा
कला – ४०,०००
वाणिज्य – ३०,०००
विज्ञान – ३५,०००
विधी – १,५००
गृहविज्ञान – ४००
गृहअर्थशास्त्र – ५००

आणखी मुदतवाढ अशक्य
अभ्यासक्रमात प्रवेशासाठी प्रवेश मिळावे यासाठी सरकारकडून परवानगी घ्यावी लागेल.व्यावसायिक तसेच अभियांत्रिकी अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू होताच बरेच विद्यार्थी इतरत्र घेतेलेले प्रवेश रद्द करून व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेतील. त्यामुळे महाविद्यालयातील जागा रिक्त होणार आहेत. मात्र विद्यापीठाची प्रवेशाची तारीख निघून गेल्याने या जागा रिक्तच राहतील. यामुळे ज्यांना व्यावसायिक तसेच अभियांत्रिकी व्यतिरिक्त प्रवेश घ्यायचा आहे अशा विद्यार्थ्यांनाही प्रवेशापासून वंचित राहावे लागणार आहे. त्यामुळे पदवी प्रवेशाला मुदतवाढ देण्याची मागणी प्राचार्य फोरमने केली आहे.मात्र कुलगुरूच्या अधिकारात असलेली मुदतवाढ करण्यात आलेली आहे. आता पुन्हा मुदतवाढ देता येणे शक्य नाही, असे कुलगुरु डॉ. सुभाष चौधरी यांनी स्पष्ट केले आहे.