सावधान ! ओएलएक्सवर खरेदी करताय ? अशी होऊ शकते तुमची फसवणूक

-ओएलएक्सवर ठकबाजांची टोळी सक्रीय -वाहन विक्रीच्या नावावर लोकांची करताहेत फसवणूक नागपूर. स्वस्त किमतीत वाहन मिळण्याचे आमिष दाखवून सतत लोकांची फसवणूक केली जात आहे. ओएलएक्स नावाच्या वेबसाईटवर

-ओएलएक्सवर ठकबाजांची टोळी सक्रीय

-वाहन विक्रीच्या नावावर लोकांची करताहेत फसवणूक

नागपूर. स्वस्त किमतीत वाहन मिळण्याचे आमिष दाखवून सतत लोकांची फसवणूक केली जात आहे. ओएलएक्स नावाच्या वेबसाईटवर ठकबाजांची टोळीच सक्रिय आहे. महागडी वाहने स्वस्त किमतीत विक्रीची जाहिरात देऊन लोकांना चुना लावला जात आहे. दररोजच अशाप्रकारचे प्रकरण समोर येत आहेत. पारडी आणि गिट्टीखदान पोलिसांनी असे दोन प्रकरण नोंदविले आहेत. कापसी, भंडारा रोड निवासी शुभम शेखर बांगरे (२७) च्या तक्रारीवरून पारडी पोलिसांनी अज्ञात आरोपीवर गुन्हा नोंदविला आहे. शुभमला सेकंड हॅण्ड कार खरेदी करायची होती. ८ जानेवारीला ओएलएक्सवर शोध घेत असताना त्याला एमएच-०२/सीव्ही-७४४१ क्रमांकाच्या कारची जाहिरात दिसली. शुभमने दिलेल्या नंबरवर कॉल केला. संदीपकुमार नावाच्या आरोपीशी ४० हजार रुपयात सौदा झाला. संदीपने आधी फोन पे अॅपच्या माध्यमातून ४,५०० रुपये मागविले. काही दिवसानंतर फोन केला आणि विम्याचे १६,७०० रुपये जमा करण्यास सांगितले. शुभमने ती रक्कमही जमा केली. यानंतर आरोपीशी संपर्क केला असता पूर्ण पैसे मिळाल्याशिवाय कार देणार नसल्याचे त्याने सांगितले आणि पुन्हा १५०० रुपये जमा करण्यास सांगितले. यावेळी शुभमला संशय आला, मात्र तोपर्यंत २२,४०० रुपयांचा चुना लागला होता. अशीच फसवणूक डोये लेआऊट, झिंगाबाई टाकळी निवासी विनोद गजानन काळमेघे (४३) यांची करण्यात आली. गतवर्षी डिसेंबरमध्ये विनोदने ओएलएक्सवर एमएच-१२/जेएम-६८६५ क्रमांकाची कार विक्रीसाठी असल्याची जाहिरात पाहिली. त्यांनी दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क करून १.१० लाख रुपयात सौदा केला. आरोपीने गुगल पे अॅपच्या माध्यमातून ७३,७९९ रुपये आपल्या खात्यात जमा करून घेतले. यानंतर तो वाहन देण्यास टाळाटाळ करू लागला आणि फोन बंद केला. दोन्ही घटनांमध्ये पोलिसांनी फसवणूक आणि आयटी अॅक्टच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदविला आहे. २ दिवसांपूर्वीही गिट्टीखदान ठाण्यांतर्गत अशी घटना समोर आली होती.