नागपुरात गणेशोत्सवात लॉकडाउन लागणार? पालकमंत्र्यांचा इशारा

कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी काही निर्बंध लावावे लागणार आहेत. हे निर्बंध येत्या दोन तीन दिवसात लावण्यात येतील. निर्बंध लावण्यापूर्वी लोकांशी चर्चा करण्यात येईल. पाच दिवसापासून जिल्ह्यात एकाही कोरोना बळीची नोंद झाली नाही. मात्र, धोका लक्षात घेऊन निर्बंध लावण्यात येणार.

  नागपूर (Nagpur) : गेल्या काही दिवसांपासून नागपूरमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. त्यातच जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी मोठं विधान केलं आहे. येत्या तीन ते चार दिवसात नागपूरमध्ये लॉकडाऊन लावण्याचं सूतोवाच नितीन राऊत यांनी केलं आहे. त्यामुळे नागपूरला पुन्हा एकदा लॉकडाऊनमध्ये जावं लागणार असल्याचं दिसून येत आहे.

  गेल्या काही महिन्यांपासून नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या एक आकडी संख्येत होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ही संख्या डबल अंकी झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर नितीन राऊत यांनी आज विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात एका बैठकीचं आयोजन केलं होतं. यावेळी राऊत यांनी कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन अधिकारी आणि डॉक्टरांना सूचनाही केल्या. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधतान लॉकडाऊन लावण्याचे सूतोवाच केलं.

  तिसरी लाट आली
  आपण सारखं म्हणतो दुसरी लाट संपली आणि तिसरी लाट येणार. आता तिसऱ्या लाटेने आपल्या जिल्ह्यात पाऊल टाकले आहे. त्यामुळे कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी काही निर्बंध लावावे लागणार आहेत. हे निर्बंध येत्या दोन तीन दिवसात लावण्यात येतील. निर्बंध लावण्यापूर्वी लोकांशी चर्चा करण्यात येईल. चेंबर ऑफ कॉमर्सशी चर्चा करू. हॉटेल व्यावसायिकांशी चर्चा करू आणि मीडियाशीही चर्चा करून सर्वांची मते जाणून घेऊन नंतर निर्णय घेऊ. मात्र, येत्या तीन दिवसात त्यावर निर्णय घेतला जाईल, असं त्यांनी सांगितलं.

  विकेंड लॉकडाऊनची शक्यता
  राऊत यांनी यावेळी विकेंड लॉकडाऊन लावण्याची शक्यताही वर्तवली आहे. तसेच रेस्टॉरंट आणि दुकानाच्या वेळा कमी करण्याचे संकेतही त्यांनी दिले. गेल्या पाच दिवसापासून जिल्ह्यात एकाही कोरोना बळीची नोंद झाली नाही. मात्र, येणाऱ्या काळातील धोका लक्षात घेऊन निर्बंध लावण्यात येणार आहे. त्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत.