भरधाव कार कम्पाऊंड वॉलला आदळून उलटली; दोघी मैत्रिणींना तडफडत सोडून दारुड्या मित्रांचा पोबारा

जेवण झाल्यानंतर रात्री 10 वाजताच्या सुमारास चौघेही जण घरी येण्यास निघाले. चिराग कार चालवत होता तर त्याच्या बाजूला गिरीश बसला होता. दोन्ही तरुणी मागील सीटवर बसल्या होत्या. चिराग हा वेगात कार चालवत होता.

  नागपूर (Nagpur) : कारवरील नियंत्रण (car accident in Nagpur) सुटल्याने झालेल्या अपघातात नागपुरातील दोन तरुणींचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अपघात इतका भीषण होता की, कार एका घराच्या कम्पाऊंड वॉलमध्ये घुसली. अपघाताच्या वेळी कारमध्ये चौघे जण होते, त्यापैकी दोन मैत्रिणींना प्राण गमवावे लागले, तर दोन मित्र जखमी झाले आहेत.

  नागपूरच्या सतरंजीपुरा आणि इतवारी परिसरात राहणाऱ्या दोन तरुणींचा कार अपघातात मृत्यू झाला. अपघातात दोन युवक गंभीर जखमी झाले आहेत. नागपूरमधील अमरावती मार्गावरील भरतनगर परिसरात हा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की नियंत्रण सुटल्यानंतर कार एका घराच्या कम्पाऊंड वॉलमध्ये घुसली.

  नेमकं काय घडलं?
  मृत तरुणी आणि जखमी तरुण हे मित्र होते. रविवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास चौघे जण एमएच 31 ईवाय 8899 क्रमांकाच्या बोलेरो कारने वाडी येथील हॉटेलमध्ये जेवायला गेले. जेवण झाल्यानंतर रात्री 10 वाजताच्या सुमारास चौघेही जण घरी येण्यास निघाले.

  चिराग कार चालवत होता तर त्याच्या बाजूला गिरीश बसला होता. दोन्ही तरुणी मागील सीटवर बसल्या होत्या. चिराग हा वेगात कार चालवत होता. भरतनगर येथील पंजाब नॅशनल बँकेजवळून येत असताना चिरागचा भरधाव कारवरील ताबा सुटला आणि कार फुटपाथवर चढून बाजूला असलेल्या झाडाला धडकली. त्यानंतर कार बाजूलाच असलेल्या घराच्या कम्पाऊंड वॉलला आदळून उलटली.

  चिरागला अटक
  अपघातानंतर गिरीश घटनास्थळीच जखमी अवस्थेत बसून राहिला, तर कारचालक चिराग पळून गेला. गिरीशने त्याचा मोबाइल क्रमांक पोलिसांना दिला. पोलिसांनी चिरागसोबत संपर्क साधून त्याला घटनास्थळी येण्यास सांगितले. परंतु, तो आला नाही. पोलिसांनी त्याचे लोकेशन ‘ट्रेस’ करून सेंट्रल एव्हेन्यू चौकातून त्याला ताब्यात घेतले. त्यावेळी तो मद्यधुंद होता, असे सांगितले जाते. याप्रकरणी अंबाझरी पोलिसांनी अपघाताचा गुन्हा नोंदवून चिरागला अटक केली.