‘ED चा वापर इंदिरा गांधींनी किती वेळा केला? इतिहास माहिती नसेल तर सुप्रियाताई बाबांना विचारा’

“सुप्रिया ताईंना आम्ही सत्तेचा गैरवापर करतोय असं वाटत असेल तर त्यांनी इंदिरा गांधींनी सत्तेचा गैरवापर कशा प्रकारे केला हे बाबांना विचारावं." चंद्रकांत पाटील यांचा सुप्रिया सुळेंना सल्ला.

    मंत्री अनिल परब व खासदार भावना गवळी यांना ईडीने नोटीस पाठवल्यानंतर “आमच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना टार्गेट केलं जातंय” असा आरोप राष्ट्रवादीच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी केला होती. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

    चंद्रकांत पाटील म्हणाले की, “सुप्रिया ताईंना आम्ही सत्तेचा गैरवापर करतोय असं वाटत असेल तर त्यांनी इंदिरा गांधींनी सत्तेचा गैरवापर कशा प्रकारे केला हे बाबांना विचारावं. ईडीचा आणि सीबीआय सारख्या संस्थांचा वापर इंदिरा गांधींनी किती वेळा केला यावर एक स्वतंत्र पुस्तकच होऊ शकेल. सुप्रियाताई तुम्हाला हा इतिहास माहिती नसेल तर बाबांना विचारा.” अशी प्रतिक्रिया दिली आहे.

    नारायण राणे यांच्या अटकनाट्यामुळे भाजपने ‘करारा जवाब मिलेगा’ असा जाहिर इशारा दिला होता. राणेंची यात्रा संपली आणि लगेचच अनिल परब व भावना गवळी यांच्या मागे ईडीची पीडा लागली. यावर सुप्रिया सुळे यांनी भाजप सूडबुद्धीने ही कारवाई करत असल्याची टीका केली होती.

    नेमकं काय म्हणाल्या होत्या सुप्रिया सुळे?

    वर्धा येथे माध्यम प्रतिनिधींशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “आमच्या सरकाच्या जेष्ठ नेत्यांना, सगळ्या मंत्र्यांना टार्गेट केले जातंय, असं मी कधीच पाहिलं नव्हतं. कधी कुणाच्या आईला तर कधी कुणाच्या बायकोला चौकशीसाठी बोलवलं जातंय. ही कुठली संस्कृती आहे? ते काय विचार करतात हे मी नाही सांगू शकत, पण हे सुसंस्कृत महाराष्ट्रात किंवा भारतीय संस्कृतीत कधी असं पाहिलं नाही, हे दुर्दैवी आहे.”