पूरग्रस्त मराठवाड्याला मदतीचा हात हवा मात्र; राज्य सरकारकडून फक्त घोषणाच : दौऱ्यावर जाण्यापूर्वी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची टिका

मालमत्तांच्या नुकसानीसोबतच मराठवाड्यातील शेतमालांवर ओल्या दुष्काळाने घाला घातला आहे. त्यामुळे पंचनामे नंतर करा आधी तातडीची मदत वाटप करा असे आवाहन त्यांनी राज्य सरकारला केले आहे.

  नागपूर: राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस उद्यापासून पूरग्रस्त मराठवाडा दौऱ्यावर जाणार आहेत. राज्य सरकारने पूरग्रस्त मराठवाड्यात तातडीने मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी नागपूर  येथे माध्यमांसमोर बोलताना केली आहे.

  तातडीची मदत वाटप करा
  मराठवाड्याला मदतीचा हात नाही. राज्य सरकारच्या घोषणा हवेत विरल्या आहेत. कोणत्याही पूरग्रस्तांना राज्य सरकारची मदत मिळाली नाही. मराठवाड्यावर अक्षरश: अस्मानी संकट कोसळले आहे. अनेक वर्षात झाला नाही असा पाऊस कोसळल्याने विभागातील शेती वाहून गेली आहे. पावसामुळे ठिकठिकाणी घरांची पडझड झाली.

  शेतमालांवर ओल्या दुष्काळाचा घाला
  तसेच नदीनाल्यांना आलेल्या पुरामुळे अनेक गावांचा संपर्क काही काळ तुटला होता. अनेक ठिकाणी झाडे जमीनदोस्त झाली.

  मुंबईतील विकासाच्या अनेक योजना मार्गी
  यावेळी मुंबईच्या सागरी नियंत्रण कायद्याच्या आराखड्याला मंजूरी मिळाल्या बंद्दल फडणवीस यानी आनंद व्यक्त केला. ते म्हणाले की, मी मुख्यमंत्री असताना यासाठी पाठपुरावा केला होता, त्याला यश आले आहे त्यामुळे मुंबईतील विकासाच्या अनेक योजना मार्गी लागणार असून सामान्यांच्या घरांसाठी म्हाडाच्या कामाला वेग येणार आहे.