नागपूर – बांग्लादेशची एक इंचही जमिन भारतानं बळकावली नाही. याउलट बांग्लादेशला स्वतंत्र राष्ट्र बनवले आहे. आम्ही कुणाचीच जमीनीवर डोळा ठेवला नाही, पण कुणी आमच्या जमिनीकडे डोळे वर करुन पाहिलंच तर, आमच्याकडे डोळे काढून घ्यायची क्षमता आहे. असा धमकीवजा इशाराच केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी चीनला दिला आहे.

नागपूरातील राजस्थान जनसंवाद रॅलीत बोलताना त्यांनी चीनला चांगलाच सज्जड दम भरला. गडकरी म्हणतात ‘भारत हा विस्तारवादी देश नसून आम्ही कुठल्याही प्रकारच्या दहशतवादाचं कधीच समर्थन करत नाही.’

शांती व अहिंसा या मूल्यांनी आम्ही वाटचाल करतो. मात्र शक्तिशाली झाल्यावरच आपण देशामध्ये शांती आणि सुरक्षा कायम ठेऊ शकतो. यासाठी आम्ही देशाला बलवान बनविण्यासाठी योग्य पाउलं टाकीत आहोत. असंही मत गडकरींनी व्यक्त केलं आहे.

दरम्यान, गलवान खोऱ्यात भारतीय सैनिकांवर चीनी सैनिकांनी भ्याड हल्ला केला. या घटनेचा देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. सीमेवरील तणावही अद्याप कायम असल्याचं पहायला मिळत आहे.