केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले
केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले

महाविकास आघाडीचे सरकार पुढील 5 वर्षे नाही तर 25 वर्षे चालेल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेना खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. त्यावर उद्धव ठाकरे म्हणतात 25 वर्षे आम्ही सत्तेत राहू, मग आम्ही काय करायचं? असा मिश्किल सवाल केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी विचारला आहे. ते आज नागपुरात बोलत होते.

नागपूर (Nagpur).  महाविकास आघाडीचे सरकार पुढील 5 वर्षे नाही तर 25 वर्षे चालेल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेना खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. त्यावर उद्धव ठाकरे म्हणतात 25 वर्षे आम्ही सत्तेत राहू, मग आम्ही काय करायचं? असा मिश्किल सवाल केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी विचारला आहे. ते आज नागपुरात बोलत होते.

पुढील विधानसभा निवडणूक तिन्ही पक्ष एकत्र लढले तर आमचा मार्ग साफ आहे, असा विश्वास रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे. मुंबई महापालिका निवडणूकही आम्ही जिंकल्याशिवाय राहणार नाही, असा दावाही त्यांनी केलाय. भाजप आणि आम्ही एकत्रच राहू. मुंबईत शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र लढेल. पण काँग्रेस स्वतंत्र लढण्याची शक्यता आठवलेंनी व्यक्त केलीय. तसंच आम्ही जिंकलो तर महापौर भाजपचा आणि उपमहापौर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा होईल, असा दावाही त्यांनी केला आहे. उद्धव ठाकरे यांचे सरकार राष्ट्रवादी काँग्रेसच्या जोरावर असल्याची टीकाही त्यांनी केलीय.

शेतकरी आंदोलनावर तोडगा निघेल
शेतकऱ्यांना जे कायद्यात नको आहे ते त्यांनी सांगावं, त्यावर तोडगा काढला जाऊ शकतो, असा विश्वासही आठवले यांनी व्यक्त केला आहे. केंद्र सरकारकडून सकारात्मक भूमिका घेतली जात असल्याचंही आठवले म्हणाले.

‘शरद पवारांवर अन्याय’
प्रफुल्ल पटेल यांच्या लेखाचा दाखला देत रामदास आठवले यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रसेला टोला लगावला आहे. शरद पवार यांना पंतप्रधानपदापासून दूर ठेवलं गेलं हा पवारांवरील अन्याय आहे. सोनिया गांधी यांच्यासाठी नियम बदलण्यात आले. मात्र, पवारांवर अन्याय करण्यात आला, असा टोला आठवलेंनी लगावलाय.

प्रकाश आंबेडकरांनी NDA सोबत यायला हवं
वेगळं लढून मतं खाण्यापेक्षा प्रकाश आंबेडकर यांनी NDA सोबत यायला हवं. त्यावर त्यांनी विचार करावा, असं आवाहन रामदास आठवले यांनी केलं आहे. आता राज्यात पक्ष विस्ताराचं काम सुरु आहे. जिथे शक्य असेल तिथे आम्ही ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपसोबत युती करणार आहोत. भाजपने आम्हाला जागा द्याव्यात, अशी मागणी आठवले यांनी केली आहे.