नागपुरातील ऑर्डनन्स फॅक्ट्रीत पुन्हा बिबट्या आढळला

    नागपूर (Nagpur). अंबाझरी (Ambazari) क्षेत्रातील ऑर्डनन्स फॅक्टरी (the Ordnance Factory) परिसरात गुरुवारी पहाटे पुन्हा एकदा बिबट्याचे (The leopard) दर्शन झाले. एक तासाच्या अंतराने याच परिसरात दोनवेळा बिबट्या दिसला असल्याची माहिती आहे. याआधी ९ जुलै रोजी बिबट्याचे वास्तव्य (the leopard’s habitat) नोंदविण्यात आले होते.

    ऑर्डनन्स फॅक्टरी येथील चौकी क्रमांक १० ते ११ यांच्या दरम्यानच्या क्षेत्रात मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास एका जवानाला बिबट दिसला. त्यानंतर लगेचच एक तासाने, पहाटे अडीच वाजता पुन्हा एकदा एका कर्मचाऱ्याला चौकी क्रमांक नऊजवळील कच्च्या रस्त्यावर बिबट्या आढळून आला.

    ही माहिती मिळताच वनविभागाच्या हिंगणा परिक्षेत्राचे कर्मचारी आणि राज्य राखीव दलाच्या जवानांना या परिसरात तैनात करण्यात आले आहे. या संपूर्ण परिसरात गस्त सुरू करण्यात आली आहे. या परिसरात पिंजरे लावून बिबट्याला जेरबंद करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत.

    दरम्यान, हा संपूर्ण जंगलाचा परिसर वन्यप्राण्यांच्या अधिवासासाठी उपयुक्त आहे. अंबाझरी जैवविविधता उद्यानापेक्षा हा चौपट मोठा परिसर असल्याने भीती बाळगण्याचे कारण नाही. मात्र, नागरिकांनी रात्री आणि एकटे फिरू नये, शेतात जाताना हातात काठी ठेवावी. नागरिकांना बिबट आढळल्यास त्यांनी हेल्पलाइन क्रमांक १९२६ किंवा ०७१२-२५१५३०६ या क्रमांकांवर संपर्क साधावा असे आवाहन नागपूरचे उपवनसंरक्षक भरतसिंग हाडा यांनी केले आहे.