विधवा महिलेसोबत ‘लिव्ह इन रिलेशनशिप’, विश्वास संपादन करून केला बलात्कार

निखिलने पीडित महिलेला तिच्या मुलांचे पालनपोषण करण्याचे आश्वासन दिले. २०१९ मध्ये त्याने घरीच तिच्या भांगेत कुंकू भरले, ‘आता आपले लग्न झाले. आपण पती-पत्नी आहोत’ असे सांगून तिच्याशी संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर तो तिचे शारीरिक शोषण करायला लागला.

    नागपूर (Nagpur) : लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये असताना ३५ वर्षीय विधवा महिलेवर २५ वर्षीय युवकाने बलात्कार (nagpur crime) केला. तिला लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक शोषण केल्यानंतर लग्नास नकार दिला. या प्रकरणी विधवेच्या तक्रारीवरून सदर पोलिसांनी (Sadar police nagpur) बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. निखील सुप्रबुद्ध शेंडे (वय २५ रा. सदर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेच्या पतीचे २०१४ मध्ये निधन झाले. ती दोन अपत्यांसह राहते. निखिलची या महिलेशी ओळख झाली. ती एकटी मुलासह राहत असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यामुळे त्याने मदत करण्याच्या बहाण्याने तिच्या घरी येणे-जाणे सुरू केले. काही दिवसांनी त्याने तिला ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहण्याची गळ घातली. पती नसल्यामुळे समाजाच्या वाईट नजरेतून वाचण्यासाठी तिने निखिलसोबत राहण्याची तयारी दर्शविली. त्याने तिला लग्नाचे आमिष दाखविले.

    निखिलने पीडित महिलेला तिच्या मुलांचे पालनपोषण करण्याचे आश्वासन दिले. २०१९ मध्ये त्याने घरीच तिच्या भांगेत कुंकू भरले, ‘आता आपले लग्न झाले. आपण पती-पत्नी आहोत’ असे सांगून तिच्याशी संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर तो तिचे शारीरिक शोषण करायला लागला. महिलेने कोर्ट मॅरेज करण्याची गळ घातली. त्यासाठी निखिल तयार झाला नाही. उलट महिला व मुलीची बदनामी करण्याची धमकी दिली. महिलेने सदर पोलिस स्टेशन गाठून तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.