रा. स्व. संघाचे माजी बौद्धिक व प्रचार प्रमुख माधव गोविंद उपाख्य बाबुराव वैद्य
रा. स्व. संघाचे माजी बौद्धिक व प्रचार प्रमुख माधव गोविंद उपाख्य बाबुराव वैद्य

रा. स्व. संघाचे माजी बौद्धिक व प्रचार प्रमुख माधव गोविंद उपाख्य बाबुराव वैद्य यांचे शनिवारी दुपारी साडेतीन वाजता निधन झाले. ते ९७ वर्षांचे होते. संघातील, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी बाबुराव वैद्य यांना श्रद्धांजली वाहिली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत व सरकार्यवाह सुरेश उपाख्य भैय्याजी जोशी यांनी संघकार्याचा सक्रिय साक्षीदार हरपल्याची भावना संघाच्या शोकसंदेशात व्यक्त केली आहे.

नागपूर (Nagpur).  रा. स्व. संघाचे माजी बौद्धिक व प्रचार प्रमुख माधव गोविंद उपाख्य बाबुराव वैद्य यांचे शनिवारी दुपारी साडेतीन वाजता निधन झाले. ते ९७ वर्षांचे होते. संघातील, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी बाबुराव वैद्य यांना श्रद्धांजली वाहिली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत व सरकार्यवाह सुरेश उपाख्य भैय्याजी जोशी यांनी संघकार्याचा सक्रिय साक्षीदार हरपल्याची भावना संघाच्या शोकसंदेशात व्यक्त केली आहे.

माधव गोविंद उपाख्य बाबूराव वैद्य यांच्या निधनाने आम्हा कार्यकर्त्यांचे छत्र हरपले आहे, अशी प्रातिनिधिक प्रतिक्रिया सरसंघचालकांच्या शोकसंदेशात व्यक्त करण्यात आली आहे. या शोकसंदेशात म्हटले आहे की, संस्कृतचे प्रगाढ विद्वान, उत्तम पत्रकार, विधान परिषदेचे सक्रिय सदस्य, उत्कृष्ट साहित्यिक असे बहुआयामी प्रतिभावंत असणाऱ्या बाबूरावांनी आपली ही सर्व गुणसंपदा संघाला समर्पित केली होती. ते संघकार्याच्या विकासाचे सक्रिय साक्षीदार होते.

वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक आणि उपजीविका या चारही आयामांमध्ये संघसंस्कार अभिव्यक्त करणारे असे त्यांचे संघानुलक्षी, संपन्न आणि सुंदर गृहस्थजीवन होते. सोप्या शब्दांत सांगायचे तर तर्कशुद्ध रीतीने आणि अनुभूतीजन्य विवेचनाने त्यांनी आपली वाणी आणि लेखणी या माध्यमातून संघाला संपूर्ण जगापुढे मांडले. त्यांची पुढची पिढीदेखील देशहितासाठी तशाच पद्धतीने आपले जीवन जगत आहे. त्यांचे दोन सुपुत्र मनमोहन आणि श्रीराम हे देखील संघाचे वरीष्ठ प्रचारक आहेत. अशा आदर्श व्यक्तिमत्त्वाच्या जाण्याने एक पोकळी निर्माण होते.

वैद्य यांच्या संपूर्ण कुटुंबास आज एक मोठे छत्र गमावल्याचा अनुभव येत असेल. त्यांचे आणि आम्हा सर्वांचे सांत्वन करणे हे कठीण आहे. बाबूरावांचे आयुष्य आपल्याला प्रत्येक परिस्थितीत अविचल राहून, न डगमगता कर्तव्यपालन करण्यास शिकवते. त्यांची ही शिकवण आचरणात आणत, या दुर्धर प्रसंगास तोंड देण्याचे धैर्य आपल्याला आणि वैद्य कुटुंबाला प्राप्त व्हावे. तसेच दिवंगताच्या आत्म्यास त्याच्या जीवनतपस्येच्या अधिकारानुसार शांती व गती मिळावी हीच प्रार्थना, अशा शब्दांत बाबूराव यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे.