नागपूर शहरालगतची गावे मेट्रो रेल्वेने जोडणार; केंद्रीय नगरविकास खात्याची हिरवी झेंडी

    नागपूर (Nagpur) : मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे काम (The first phase of Nagpur Metro) ९० टक्के पूर्ण झाले आहे. आता नागपूर शहरालगतच्या गावांना (the suburban villages of Nagpur) जोडणाऱ्या मेट्रो रेल्वेच्या दुसऱ्या टप्प्यालाही (the second phase of the metro railway) केंद्रीय नगरविकास खात्याने (The Union Urban Development Department) हिरवा कंदील दाखवला आहे. लवकरच हा प्रस्ताव (The proposal) केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीपुढे (the Union Cabinet meeting) येईल, असे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री (Union Transport Minister) नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी शुक्रवारी येथे सांगितले.

    नागपुरातील मेट्रोच्या बर्डी ते कस्तुरचंद पार्क या १.६ किलोमीटर मार्गिकेचे तसेच त्यावरील कस्तुरचंद पार्क आणि झिरोमाईल स्थानके व फ्रिडम पार्कच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुंबईतून तर केंद्रीय नगरविकास मंत्री हरदीपसिंग पुरी व या खात्याचे सचिव व महामेट्रोचे अध्यक्ष द्वारकाप्रसाद मिश्रा हे आभासी पद्धतीने या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

    मेट्रो टप्पा दोनचा प्रस्ताव तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात तयार करण्यात आला होता. त्यानंतर राज्य शासनाने त्याला मंजुरी देऊन तो केंद्र सरकारकडे पाठवला होता. केंद्र सरकारच्या अर्थखात्यासह इतर तांत्रिक समित्यांच्या मंजुरीनंतर तो केंद्रीय नगरविकास खात्याकडे गेला. या खात्यानेही त्याला मंजुरी दिली असून लवकरच तो केंद्रीय मंत्रिमंडळापुढे सादर केला जाईल, असे गडकरी यांनी स्पष्ट केले. याबाबत त्यांनी केंद्रीय मंत्री हरदीपसिंग यांचे आभारही मानले.