नितीन गडकरींना भाषणाचे पैसे मिळतात; महिन्याला चार लाखांची ‘वरकमाई’

‘मी युट्यूबवरुन जी भाषणे दिली आहेत, त्यासाठी मला आता युट्यूबकडून पैसे दिले जातात. आजघडीला मला युट्यूबकडून महिन्याला चार लाख रुपये मिळतात, अशा शब्दात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या ‘वरकमाई’चा किस्सा प्रांजळपणे सांगून टाकला आहे़.

    मुंबई : ‘मी युट्यूबवरुन जी भाषणे दिली आहेत, त्यासाठी मला आता युट्यूबकडून पैसे दिले जातात. आजघडीला मला युट्यूबकडून महिन्याला चार लाख रुपये मिळतात, अशा शब्दात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या ‘वरकमाई’चा किस्सा प्रांजळपणे सांगून टाकला आहे़.

    हे पैसे मी कोव्हिडसंदर्भातील कामांसाठी देणगी म्हणून देत आलो आहे, अशी माहिती त्यांनी दिली. देशातील वेगवेगळ्या विद्यापिठांमधील कुलगुरुंशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधताना गडकरी यांनी अनेक मनोरंजक गोष्टी दिलखुलासपणे उघड केल्या.

    आपण सोशल मीडिया फारसा वापरत नव्हतो़ मात्र कोरोना कालावधीमध्ये अापण त्याचा जास्त वापर करु लागलो, असे सांगून गडकरी म्हणाले की, कोरोना काळात सोशल नेटवर्किंगमुळे दैनंदिन आयुष्याबरोबरच अनेक बदल आपल्यात घडले आहेत़

    कोरोनामुळे माझ्या आयुष्यात दोन तीन बदल झाले. रोज सकाळ संध्याकाळ मी २५ मिनिटे पायी चालतो. मी मोबाइलवर गाणी ऐकण्याबरोबरच युट्यूबवर अनेक व्हिडीओ पाहतो. मी युट्यूबवर भगवतगीताही ऐकू लागलो. मला दहावा अध्याय आणि त्याचे पूर्ण विवेचन शांततेत ऐकण्याची संधी या कालावधीमध्ये मिळाली. ही माझ्यासाठी मोठी प्राप्ती होती, असे म्हणाले़

    कोरोनापूर्व काळात आपण फार सोशल नेटवर्किंग फ्रेण्डली नव्हतो. त्यामुळेच सोशल नेटवर्किंगवर फार सक्रीय नव्हतो. पंतप्रधान मोदी आम्हाला यासंदर्भातील माहिती देत यावर सक्रीय राहण्याचा आग्रह करायचे. मात्र मला ते जमत नव्हते. पण कोरोना कालावधीमध्ये आपण जवळजवळ ९५० व्हिडीओ कॉन्फरन्स घेतल्या. या काळात ट्विटरवर एक कोटी २० लाख फॉलोर्स माझ्याशी नव्याने जोडले गेले, असे त्यांनी सांगितले़.