नागपूरच्या कोरोना आढावा बैठकीनंतर नितीन राऊतांचं मोठं विधान, म्हणाले…

ज्यात जरी कोरोना रुग्णसंख्या कमी होत असली तरीदेखील तिसऱ्या लाटेची भीती कायम आहे. गेल्या काही दिवसांपासून नागपूरमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. त्यातच जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी मोठं विधान केलं आहे. येत्या तीन ते चार दिवसात नागपूरमध्ये लॉकडाऊन लावण्याचं सूतोवाच नितीन राऊत यांनी केलं आहे.

    नागपूर : राज्यात जरी कोरोना रुग्णसंख्या कमी होत असली तरीदेखील तिसऱ्या लाटेची भीती कायम आहे. गेल्या काही दिवसांपासून नागपूरमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. त्यातच जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी मोठं विधान केलं आहे. येत्या तीन ते चार दिवसात नागपूरमध्ये लॉकडाऊन लावण्याचं सूतोवाच नितीन राऊत यांनी केलं आहे.

    त्यामुळे नागपूरला पुन्हा एकदा लॉकडाऊनमध्ये जावं लागणार असल्याचं दिसून येत आहे. येत्या तीन दिवसात निर्णय घेतला जाईल आपण सारखं म्हणतो दुसरी लाट संपली आणि तिसरी लाट येणार. आता तिसऱ्या लाटेने आपल्या जिल्ह्यात पाऊल टाकले आहे. त्यामुळे कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी काही निर्बंध लावावे लागणार आहेत. हे निर्बंध येत्या दोन तीन दिवसात लावण्यात येतील. निर्बंध लावण्यापूर्वी लोकांशी चर्चा करण्यात येईल. चेंबर ऑफ कॉमर्सशी चर्चा करू. हॉटेल व्यावसायिकांशी चर्चा करू आणि मीडियाशीही चर्चा करून सर्वांची मते जाणून घेऊन नंतर निर्णय घेऊ. मात्र, येत्या तीन दिवसात त्यावर निर्णय घेतला जाईल, असं त्यांनी सांगितलं आहे.

    विकेंड लॉकडाऊनची शक्यता

    राऊत यांनी यावेळी विकेंड लॉकडाऊन लावण्याची शक्यताही वर्तवली आहे. तसेच रेस्टॉरंट आणि दुकानाच्या वेळा कमी करण्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत. गेल्या पाच दिवसापासून जिल्ह्यात एकाही कोरोना बळीची नोंद झाली नाही. मात्र, येणाऱ्या काळातील धोका लक्षात घेऊन निर्बंध लावण्यात येणार आहे. त्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. असं नितीन राऊत यांनी म्हटलं आहे.

    निर्बंधाबाबत मुख्यमंत्री काय म्हणाले?

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुढे बोलताना ते म्हणाले, “राज्याचा मुख्यमंत्री म्हणून सरकारला या संकटाशी सामना करण्यासाठी संपूर्ण तयारीत राहण्याच्या स्पष्ट सूचना आहेतच, पण सत्ताधारी, विरोधी अशा सर्वच पक्षांना मी आवाहन करीत आहे की, आता अधिक काळजी घ्या. गर्दीचे कार्यक्रम टाळा. सण, उत्सव आले आहेत, त्यावर निर्बंध लावावेत असे कोणाला वाटेल? पण शेवटी आपले आरोग्य, प्राण महत्त्वाचे. उत्सव नंतरही साजरे करू”. असं ते म्हणाले.

    निर्बंध शिथिल करण्यासाठी अनेकांनी मुख्यमंत्र्यांकडे मागण्या केल्या आहेत. त्यावर देखील उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं आहे. “हे उघडा ते उघडा’ या मागण्या ठीक आहेत, पण त्यातून धोका वाढला आहे. प्रत्येकाने नियम आणि मर्यादा पाळल्या तर पुन्हा कडक निर्बंध लावण्याची वेळ येणार नाही. म्हणूनच माझ्या शिवसेनेसह सर्वच राजकीय पक्षांना मी विनम्र आवाहन करीत आहे, आपण सगळ्यांनीच शहाणपणाने वागून लोकांच्या जिवाचे रक्षण करायला हवे. सण, उत्सव आज झाले नाहीत तर उद्या नक्की येतील, पण घरातला प्रत्येक माणूस आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. लोकांच्या जिवावरील विघ्न टाळायचे असेल तर, शासनाने वेळोवेळी आखून दिलेल्या आरोग्याच्या नियमांचे पालन होईल हे काटेकोरपणे पहा, गर्दी करू नका. सार्वजनिक कार्यक्रम टाळा. राजकीय सभा, संमेलनांना उत्तेजन देऊ नका, हीच त्या विघ्नहर्त्या श्री गणेशाची इच्छा असेल”, असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत.