प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

  नागपूर (Nagpur) : पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) पदाच्या ४९६ जागांची शारीरिक चाचणी परीक्षा दोन वर्षांपासून प्रलंबित असल्याने यासाठी मैदानी सराव करणाऱ्या दोन हजार उमेदवारांना आता पोषक आहारावर महिन्याला होणारा पाच ते सहा हजार रुपयांचा खर्च करणेही कठीण झाले आहे. दुसरीकडे शारीरिक चाचणीच्या सरावामुळे या उमेदवारांचा अन्य परीक्षांचा अभ्यासही खोळंबला आहे. ‘एमपीएससी’कडून अन्य परीक्षांचे वेळापत्रक जाहीर होत असताना पोलीस उपनिरीक्षक पदाच्या उमेदवार प्रतीक्षेतच आहेत.

  महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) ४९६ पदांसाठी मार्च २०१९ मध्ये पूर्व परीक्षा घेण्यात आली. त्यानंतर २८ जुलै आणि ४ ऑगस्ट २०१९ ला मुख्य परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल २ मार्च २०२०ला जाहीर करण्यात आला. यामध्ये उत्तीर्ण झालेल्या दोन हजार उमेदवारांची निवड शारीरिक चाचणीसाठी करण्यात आली. ‘एमपीएससी’ने शारीरिक चाचणीच्या नियमात आता बदल केला आहे. यानुसार शारीरिक चाचणीचे गुण आता अंतिम गुणवत्ता यादीतून वगळण्यात आले आहेत.

  हे गुण आता केवळ पात्रतेसाठी ग्राह्य धरले जाणार आहेत. मात्र, ४९६ जागांची जाहिरात ही २०१९ची असल्याने त्यांना हा नियम लागू नाही. त्यामुळे या उमेदवारांचे शारीरिक चाचणीचे गुण हे अंतिम निकालात ग्राह्य धरले जातात. परिणामी, शारीरिक चाचणीत अधिकाधिक गुण मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना नियमित मैदानात सराव करणे अनिवार्य आहे.

  अनेक स्पर्धा परीक्षार्थी पुण्यात राहून तयारी करतात. शारीरिक चाचणीची तयारी करताना त्यांना नियमित पोषक आहार घ्यावा लागतो. यासाठी महिन्याला ६ हजारांचा खर्च करावा लागत असल्याने उमेदवारांनी सांगितले. एमपीएससीकडून मराठा आरक्षणाचा तिढा सुटल्यानंतर अन्य परीक्षांच्या मुलाखती आणि मुख्य परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले जात आहेत. मात्र पोलीस उपनिरीक्षक पदाची शारीरिक चाचणी दोन वर्षांपासून रखडली असतानाही यावर अद्याप कुठलाही निर्णय नाही. यामुळे उमेदवारांमध्ये संताप असून एमपीएससीने त्वरित वेळापत्रक जाहीर करावे अशी मागणी होत आहे.

  अनेकांना इजा
  मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर दोन वर्षांपासून उत्तीर्ण उमेदवार शारीरिक चाचणीचा सराव करीत आहेत. यामध्ये अनेक विद्यार्थ्यांना इजा झाल्या आहेत. सातत्याने मैदानी सरावामुळे अशा अडचणींना सामोरे जावे लागत असून उमेदवारांचे मानसिक स्वास्थ्य खराब होत आहे. शिवाय शारीरिक चाचणीच्या तयारीमुळे अन्य परीक्षांचा अभ्यासही थांबला आहे.