यशवंतराव, नरसिंह राव यांचे ओएसडी राम खांडेकर यांचं निधन, नागपूरमध्ये घेतला अखेरचा श्वास

पी. व्ही. नरसिंह राव १९८५ साली रामटेक मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवत होते. त्यावेळी खांडेकरांनी या मतदारसंघात नियोजनाचं काम केलं होतं. त्या कामाने नरसिंह राव चांगलेच प्रभावित झाले होते.

    भारताचे दिवंगत पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांचे ओएसडी (Officer on special duty) राम खांडेकर यांचं नागपूरमध्ये निधन झालं. वयाच्या ८७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मंगळवारी रात्री ८ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर अमझारी घाट या ठिकाणी आज (गुरुवार) सकाळी ९ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.

    राम खांडेकर यांच्या मागे त्यांचा मुलगा मुकुल, सून संगीता आणि गौरांग-जान्हवी अशी दोन नातवंडं असा परिवार आहे. सुरुवातीला खांडेकरांनी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि देशाचे माजी संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे ओएसडी म्हणून काम पाहिलं. त्यानंतर माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांनी त्यांना पाचारण केलं होतं.

    पी. व्ही. नरसिंह राव १९८५ साली रामटेक मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवत होते. त्यावेळी खांडेकरांनी या मतदारसंघात नियोजनाचं काम केलं होतं. त्या कामाने नरसिंह राव चांगलेच प्रभावित झाले होते. १९९१ साली पंतप्रधान झाल्यानंतर राव यांनी राम खांडेकर यांची ओएसडी म्हणून निवड केली होती. नरसिंह राव यांचे अत्यंत निकटवर्तीय अशी त्यांची ओळख होती. राव यांच्या अखेरच्या दिवसापर्यंत खांडेकर त्यांच्यासोबत होते.

    खांडेकर यांनी मराठीत विपुल लेखन केलं असून अनेक मराठी वृत्तपत्रात ते स्तंभलेखन करत असत. वेगवेगळ्या सुमारे ७० दिवाळी अंकांसाठी त्यांनी लेख लिहिले. आपल्या सेवेचा काळ आणि त्या काळात आलेल्या अनुभवांविषयी खांडेकर खुलेपणानं लिहीत आणि बोलत असत.