नागपुरात कॅन्सर इन्स्टिटय़ूटचा मार्ग मोकळा; तीन माळ्यांच्या प्रकल्पासाठी लवकरच निविदा

तातडीने इमारतीचे बांधकाम सुरू करण्यासाठी अधिष्ठाता व एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करण्याची सूचना करत त्यासाठी टाटा रुग्णालयाची मदत घेण्याचे आदेश दिले होते. या बैठकीनंतर अधिष्ठाता डॉ. गुप्ता यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात सातत्याने पाठपुरावा केला.

    नागपूर (Nagpur) : उपराजधानीतील मेडिकलच्या जागेवर प्रस्तावित कॅन्सर इन्स्टिटय़ूटचा (Cancer Institute) मार्ग मोकळा होण्याचे संकेत आहेत. या प्रकल्पासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता (Dr. Sudhir Gupta) यांनी पाठपुरावा केला. त्यामुळे नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (Nagpur Metropolitan Region Development Authority) (एनएमआरडीए)कडून ((NMRDA)) लवकरच निविदा निघणार आहे. पहिल्या टप्प्यात ही इमारत तीन माळ्यांची राहणार असल्याचे डॉ. गुप्ता यांनी सांगितले.

    या विषयावर वैद्यकीय सचिव सौरभ विजय यांनी नुकतीच बैठक घेतली होती. त्यात गेल्या नऊ वर्षांपासून रखडलेल्या या प्रकल्पाच्या विषयावर नाराजी व्यक्त केली गेली. त्यांनी एनएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनाही धारेवर धरले होते. याप्रसंगी ही जागा मेडिकलच्या अधिष्ठात्यांच्या नावावर नसून शासनाकडून यंत्रासाठीचे २३ कोटी हाफकीनकडे बऱ्याच वर्षांपूर्वी वळते झाल्याचेही समोर आले. त्यांनी तातडीने इमारतीचे बांधकाम सुरू करण्यासाठी अधिष्ठाता व एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करण्याची सूचना करत त्यासाठी टाटा रुग्णालयाची मदत घेण्याचे आदेश दिले होते. या बैठकीनंतर अधिष्ठाता डॉ. गुप्ता यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात सातत्याने पाठपुरावा केला.

    जिल्हाधिकाऱ्यांनी ही जागा त्यांच्या नावे असल्याने कॅन्सर इन्स्टिटय़ूटच्या बांधकामास त्यांची हरकत नसल्याचे पत्र देत इतर प्रक्रिया करून तातडीने निविदा काढण्यास हरकत नसल्याचे स्पष्ट केले. त्यावरून अधिष्ठात्यांनी सूचना करत एनएमआरडीएला ही प्रक्रिया तातडीने बांधकाम सुरू करण्यासाठी करण्याची गुरुवारी सूचना केली. त्यामुळे या इन्स्टिटय़ूटचा मार्ग मोकळा होण्याचे संकेत मिळाले आहे.