पैशाचा पाऊस पाडण्यासाठी वाघाच्या बछड्याचा बळी? गावाचा सरपंचच निघाला मारेकरी

जिथे हवामानात बदल झाल्याने पाऊस पडत नाही तिथं वाघ, कासव, यासारख्या वन्यप्राण्यांची पूजा करून पैश्याचे पाऊस पडू शकतो अशा बाबींवर विश्वास ठेवणारा गावचा सरपंच लोमेश दाबले आणि दुचाकीच्या शोरूममध्ये काम करणारा कालिदास हे दोघे ही पदवीधर आहे.

    नागपूर (Nagpur) : अवघ्या दहा दिवसांच्या वाघाच्या बछड्याची अंधश्रद्धेपायी पैश्याचे पाऊस पाडण्यासाठी शिकार केल्याची घटना उघडकीस आली आहे. नागपूर (Nagpur) जिल्ह्यातील बुट्टीबोरी वन परिक्षेत्राच्या हद्दीत या बछड्याचे मृत अवयवांची विक्री करताना दोघेजण वनविभागाच्या हाती लागले आहे. यात मुख्य आरोपी हा शिकार झाली त्या गावाचा सरपंच असून लोमेश दाबले असे त्याचे नाव आहे. कालिदास रायपूर हा त्याचा सहकारी असून दोघेही चंद्रपूर जिल्ह्यातील चिंचबोडी गावाचे रहिवाशी आहेत. वन अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडून मृत बछड्याचे अवयव जप्त करत पुढील तपास सुरु केला आहे.

    वाघाचा शिकारी गावाचा सरपंच निघाला
    चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्याच्या चिंचबोडी गावाचे सरपंच असलेल्या लोमेश दाबले याचे जंगल परिसरात लागून शेत आहे. तो अंधश्रद्धा ठेवणारा असल्याने वाघाच्या बछड्याची पूजा करून आपण पैसाचा पाऊस पाडू शकतो असा त्याचा गैरसमज होता. मे 2021 मध्ये या पूजेसाठी त्यांनी अवघ्या 10 दिवसाच्या वाघाचा बछड्याचा बळी दिला होता. पण शेतात पैश्याचा पाऊस न पडल्याने अखेर मृत बछड्याच्या शरीराचे जतन केले. प्रकरण शांत झाले हे अंदाज घेऊन वाघाच्या बछड्याचे मृत शरीर त्याने विक्रीसाठी काढले होते. तो 20 लाख रुपयात विक्री करणार होता. मात्र, याची चुणूक नागपूर वनविभागाला लागली. त्यामुळे वनविभागाने सक्रिय होत सापळा रचला.

    सापळा रचून केली करवाई
    वाघाच्या बछड्याच्या मृतदेहाची विक्री करण्यासाठी लोमेशने त्याचा सहकारी कालिदास रायपूरेला या बाबतचा सौदा करण्यासाठी पडोली येथे खरेदीदाराला भेटण्यासाठी पाठवले होते. याची माहिती नागपूरचे उप वनसंरक्षक डॉ. भारतसिंग हाडा यांना लागली असता त्यांनी सापळा रचून कारवाईची जवाबदारी सहायक वनसंरक्षक नरेंद्र चांदेवर यांना दिली. त्यांनी चंद्रपूर वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी अरुण गाडीवर यांच्याशी समन्वय साधत लोमेश दाबले आणि कालिदास रायपुरे या दोघांना वाघाच्या बछड्याच्या मृतदेहासह ताब्यात घेतले.

    अंधश्रद्धेचा बळी ठरला दहा दिवसांच्या वाघाचा बछडा
    जिथे हवामानात बदल झाल्याने पाऊस पडत नाही तिथं वाघ, कासव, यासारख्या वन्यप्राण्यांची पूजा करून पैश्याचे पाऊस पडू शकतो अशा बाबींवर विश्वास ठेवणारा गावचा सरपंच लोमेश दाबले आणि दुचाकीच्या शोरूममध्ये काम करणारा कालिदास हे दोघे ही पदवीधर आहे. मात्र, झटपट पैश्याच्या नादात दोघे गुन्हेगार होऊन बसले. शेवटी पैसा तर भेटलाच नाही. दोघांच्या लालसेत 10 दिवसांच्या बछड्याचा नाहक बळी गेला.