मनोज ठक्कर मारहाण प्रकरणाची गंभीर दखल; पोलीस उपनिरीक्षकासह तीन कर्मचारी निलंबित

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही मनोज ठक्कर मृत्यू प्रकरणी आरोपी पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. नागपूच्या पारडी पोलीस स्टेशन हद्दीत सात जुलैच्या रात्री ही घटना घडली.

    नागपूर. मनोज ठक्कर मारहाण प्रकरणाची गंभीर दखल घेत माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्याना पत्र पाठवल्यांनतर आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ठक्कर कुटूंबियांची भेट घेतल्यानंतर नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पोलीस उपनिरीक्षक मुकेश ढोबळे, नायक नामदेव चरडे, आकाश शहाणे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.

    मास्क लावला नाही म्हणून पोलिसांच्या मारहाणीत दिव्यांग तरुण मनोज ठक्कर यांचा मृत्यू झाला होता. मनोज ठवकर मृत्यू प्रकरणाचा तपास सीआयडीकडून सुरु आहे. भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून कारवाईची मागणी केली होती.

    दुचाकी पोलीस वाहनावर धडकली
    विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही मनोज ठक्कर मृत्यू प्रकरणी आरोपी पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. नागपूच्या पारडी पोलीस स्टेशन हद्दीत सात जुलैच्या रात्री ही घटना घडली. ३५ वर्षीय मनोज हा दिव्यांग मेकॅनिक पारडी चौक हनुमान मंदिर परिसरात सात जुलैच्या रात्री साडे आठ-नऊ वाजता घरी चालला होता. त्याची दुचाकी थांबवताना वेळीच ब्रेक न लागल्याने पोलीस वाहनावर धडकली. त्याने मुद्दाम धडक मारल्याचे समजून पोलिस उपनिरीक्षक मुकेश ढोबळे याच्यासह तिघा पोलीस कर्मचाऱ्यांनी मनोज ठक्करला मारहाण केल्याचा आरोप आहे.

    दाखल करण्याआधीच मृत घोषित
    त्यानंतर त्याला पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले. मात्र शुद्ध हरपलेल्या स्थितीत त्याला नागपुरातील भवानी मल्टिस्पेशालिटी अँड रिसर्च सेंटरमध्ये दाखल करण्या आधीच मृत घोषित करण्यात आले. मनोजच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. त्याच्या कुटुंबीयांना वीस लाख रुपयांची नुकसान भरपाई, पत्नीला सरकारी नोकरी आणि दोषी पोलिस अधिकाऱ्यांवर खटला चालवण्याची मागणी जमावाने केली होती.