शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखावर खंडणी वसुली आणि धमकाविण्याचे आरोप; हुडकेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

हितेश यादव यांनी कंत्राटदार अक्षय भांडारकर यांना जीवे मारण्याची धमकी दिली. हितेश यादव यांनी त्यांना कोंडूनही ठेवले होते. अक्षय भांडारकर यांनी कृष्णराव एलामपुल्ली यांच्याकडून पैसे घेतले होते. है पैसे त्यांना परत करता आले नव्हते.

    नागपूर (Nagpur): सध्या राज्यभरात शिवसेनेच्या नेत्यांच्या पाठी तपास यंत्रणांचा ससेमिरा लागला असतानाच आता नागपूरमध्ये पक्षाची नाचक्की करणारी घटना समोर आली आहे. नागपुरातील युवासेनेचे जिल्हाप्रमुख (Nagpur district chief of Yuvasena) हितेश यादव (Hitesh Yadav) यांच्यावर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हितेश यादव यांनी पैशांच्या वसुलीसाठी एका कंत्राटदाराला धमकावल्याचा आरोप आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हितेश यादव यांनी कंत्राटदार अक्षय भांडारकर यांना जीवे मारण्याची धमकी दिली. हितेश यादव यांनी त्यांना कोंडूनही ठेवले होते. अक्षय भांडारकर यांनी कृष्णराव एलामपुल्ली यांच्याकडून पैसे घेतले होते. है पैसे त्यांना परत करता आले नव्हते. त्यामुळे एलामपुल्ली यांचे पैसे परत मिळवून देण्याची जबाबदारी हितेश यादव यांनी उचलली. त्यासाठी हितेश यादव यांनी अक्षय भांडारकर यांना खोलीत कोंडून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले.

    या सगळ्या प्रकारानंतर अक्षय भांडारकर यांनी पोलिसांकडे धाव घेतली. त्यानंतर हुडकेश्वर पोलीस ठाण्यात हितेश यादव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. हितेश यादव यांच्यावर यापूर्वीही खंडणीखोरी आणि धमकीचे आरोप झाले होते. त्यामुळे आता पोलीस याप्रकरणात काय कारवाई करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

    काही दिवसांपूर्वी नागपुरात जादूटोण्याच्या प्रकारामुळे सात जणांना मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला होता. यामध्ये चार महिला आणि तीन वृद्धांचा समावेश आहे. ही मारहाण इतकी भीषण होती की पीडित सात पैकी पाच व्यक्तींना चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या सर्व प्रकारानंतर पोलिसांनी 12 जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता. जादूटोण्याच्या संशयावरून वृद्ध आणि महिलांना मारहाणीचा प्रकार घडला होता.