‘वर्ल्ड हिजाब डे’च्या नावाआड तरुणींवर बुरखा घालण्याची सक्ती केल्याचा आरोप

बुरखा वितरण करणाऱ्या तरुणी व महिलांना याबाबत विचारले. आज 'वल्ड हिजाब डे' असल्याने तरुणींना हिजाब (बुरखा) घालायला देत असल्याचे त्या महिलांनी सांगितले. त्यांचे बोलणे सुरू असतानाच दुचाकींवर बसून तरुणी व महिला घाईघाईने तेथून पळून गेल्या.

    नागपूर (Nagpur) : सिव्हिल लाईन्स परिसरातील वॉकर्स स्ट्रीटवर सकाळी फिरायला आलेल्या तरुणींना जबरदस्तीने बुरखा (हिजाब) घालायला लावल्याच्या प्रकाराने शनिवारी एकच खळबळ माजली. हा धर्मांतराणाचा प्रकार असल्याचे जाणून काही जागरूक नागरिकांनी घटनेची माहिती विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांना दिली. हे कार्यकर्ते घटनास्थळी पोहोचताच बुरखा देणाऱ्या तरुणी तिथून पळून गेल्या. या प्रकरणी विहिंप कार्यकर्त्यांनी सदर ठाण्यात तक्रार नोंदवून या तरुणी ज्या वाहनांवरून पळून गेल्या त्या वाहनांचे नंबर्स देखील पोलिसांना दिले आहेत.

    मुख्यमंत्री निवासस्थानापुढे असलेल्या वॉकर्स स्ट्रीटवर शहरातील अनेक तरुण- तरुणी, अधिकारी आणि इतर नागरिक सकाळी फिरायला येतात. शनिवारी सकाळी हा प्रकार फिरणाऱ्यांच्या लक्षात आला. काही बुरखाधारी तरुणी इतर तरुणींना बुरखा घालण्याची जबरदस्ती करीत होत्या. तसेच पायी फिरणाऱ्यांपैकी तरुणींना हेरून त्यांना काही पत्रकांचे वितरण देखील केले. त्या तरुणी इतर तरुणींना काहीतरी समजावून देखील सांगत होत्या.

    ४-५ तरुणींना त्यांनी काळा बुरखा घालायला लावला. हा प्रकार पाहून काही पायी फिरत असलेल्या नागरिकांना शंका आली. त्यांनी लगेचच विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांना तेथे बोलावून घेतले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता विहिंप कार्यकर्ते तेथे पोहोचले. बुरखा वितरण करणाऱ्या तरुणी व महिलांना याबाबत विचारले. आज ‘वल्ड हिजाब डे’ असल्याने तरुणींना हिजाब (बुरखा) घालायला देत असल्याचे त्या महिलांनी सांगितले. त्यांचे बोलणे सुरू असतानाच काही पावलांवरील रामगिरीसमोर उभे असलेले तरुण व पुरुष दुचाकींवर वेगाने तेथे आले. त्या दुचाकींवर बसून तरुणी व महिला घाईघाईने तेथून पळून गेल्या.

    विश्व हिंदू परिषदेचे महानगर उपाध्यक्ष अमित बेम्बी, बजरंग दल सहसंयोजक ऋषभ अरखेल, धर्मजागरणचे अनिल नायर, नारी सुरक्षा प्रमुख विनोदचंद्र नायर, संदीप नायर, रोहन बोदेले, अनिकेत अरखेल, ईशान जैन आदींसह कार्यकर्त्यांनी सदर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील चौधरी यांची भेट घेऊन त्यांना तक्रार केली व घडलेला प्रकार सांगितला. ज्या दुचाकींवरून महिला व पुरुष पळून गेले, त्यांचे क्रमांकही सादर केले. या तरुणींनी वितरित केलेली काही पत्रके देखील पोलिसांच्या सुपूर्द करण्यात आली आहे. तरुणींनी वितरित केलेल्या पत्रकांवर १५ वर्षांच्या मुलींना कुराणसंबंधी माहिती देण्याचे हस्ताक्षरात लिहिले होते. हा धर्मांतराचा प्रयत्न असल्याचा आरोपही करण्यात आला.