gajanan gatha

सरसंघचालक मोहनजी भागवत यांच्या हस्ते महालच्या संघ कार्यालयात या चित्रकथात्मक गाथेचे प्रकाशन झाले त्यावेळी त्यांच्यासोबत श्याम व भाग्यश्री पेठकर, बाजूच्या छायाचित्रांत शेगाव येथे प्रकाशनानंतर स्वाक्षरी करताना संस्थानचे विश्वस्त शिवशंकरभाऊ पाटील.

  • सशक्त पिढी घडविण्यासाठी हे पुस्तक महत्त्वाचे : सरसंघचालक
  • संस्थेची ही संकल्पना पूर्णत्वास जात आहे : शिवशंकरभाऊ पाटील

नागपूर. श्री गजानन गाथा, या संतश्रेष्ठ गजानन महाराजांच्या लिलांचे चित्रकथात्मक गाथेच्या पुस्तकाचे प्रकाशन नागपूर आणि शेगाव येथे आभासी पद्धतीने नुकतेच पार पडले. सरसंघचालक मोहन भागवत आणि श्री गजानन महाराज संस्थांनचे विश्वस्त शिवशंकरभाऊ पाटील यांच्या हस्ते हा दोन्ही ठिकाणचा प्रकाशन सोहळा अत्यंत अनौपचारिक पद्धतीने पार पडला.

नागपूर येथील महालच्या संघ कार्यालयांत सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला. आत्मनिर्भर भारत घडविण्यासाठी जी सशक्त पिढी हवी आहे तशी पिढी घडविण्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचे असे पुस्तक आहे. ईश्वर आराधना, संत चरित्रांचे आकलन या दृष्टीने हा ग्रंथ महत्त्वाचा आहेच, असे यावेळी बोलताना मोहन भागवत म्हणाले.

समजायला सोपे, मांडणी- सजावट या दृष्टीने आकर्षक, त्यात ही मांडणी सचित्र असल्याने नव्या पिढीला समजायला सोपी आणि सरळ आहे. पारतंत्र्याच्या अंधारलेल्या काळांत देशाला नव्याने जाग येत होती. त्या काळांत सामाजिक पुरुषार्थ जागृत करण्यासाठी आणि आपल्या युगानूयुगे चालत आलेल्या परंपरांची, क्रियाकलापांची पायाभरणी करण्यासाठी काही सत्पुरुष देशाच्या सर्वच भागांत जन्म घेते झाले. संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज हे त्यातले महत्त्वाचे संत आहेत. त्यांची सचित्र गाथा येत्या काळांत अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ म्हणून समोर येईल, हे नक्की, असेही मोहनजी भागवत म्हणाले.  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत प्रचारक प्रसाद महानकर यावेळी उपस्थित होते.

gajanan gatha

शेगाव येथे शिवशंकरभाऊंच्य निवासस्थानी हाच सोहळा घेण्यात आला. त्यावेळी हा ग्रंभ गजाननार्पण करताना शिवशंकरभाऊ पाटील म्हणाले, श्रींची अशी चित्रकथात्मक गाथा व्हावी, ही शेगाव संस्थानची जुनी इच्छा आहे. त्यासाठी आम्ही तीन वेळा प्रयत्न केले. मात्र ही गाथा अशा पद्धतीने श्याम पेठकर व वर्डस् अँड व्ह्यूज या संस्थेकडून पूर्ण व्हावे ही महाराजांचीच इच्छा असावी. हे पुस्तक अबालवृद्धांना अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याचा श्रीच्या सर्व भक्तांनी लाभ घ्यावा.

या ग्रंथाची संकल्पना मानडणारे आणि लेखन करणारे श्याम पेठकर यांनी प्रास्ताविक केले. हा ग्रंथ लहानपणी आपण कॉमिक्स किंवा अमर चित्रकथा वाचायचो तसा केला तर नव्या पिढीला तो कळेल आणि प्रौढ भक्तांनाही कुठही सहज श्री गजानन महाराजांची ही कहाणी चित्ररूपात अ‍ॅनिमेशन पट पाहिल्यासारखी अनुभवता येईल. या ग्रंथाच्या निर्मितीत सहकार्य करणारे जयंत म्हैसकर आणि इतर अनेक स्नेह्यांचा मी आभारी आहे, असे पेठकर म्हणाले.

या आभासी समारंभाला विदर्भ प्रांत सहकार्यवाह प्रा. अतुल मोघे, नागपूर महानगर सामाजिक सद्भाव प्रमुख प्रा. गुलाब वंजारी, या ग्रंभाचे स्टोरी बोर्ड- संवाद लिहिणारे लेखक श्याम पेठकर, वर्डस् अँड व्ह्यूजच्या संचालक भाग्यश्री पेठकर, चित्रकार अजय रायबोले, अजय बिवडे, नितीश गाडगे, नागपूर सकाळचे कार्यकारी संपादक संदीप भारंबे, राजेंद्र शेगोकार हे उपस्थित होते.