दुसरे लग्न केले आणि मानसिक संतुलन बिघडले; कपभर चहासाठी केली आत्महत्या

रविवारच्या पहाटे ३.३०च्या सुमारास त्याने पत्नीला चहा मागितला. परंतु, झोपेत असलेल्या पत्नीने त्याला चहा दिला नाही. त्यानंतर त्याने लाकडी बल्लीला दोरी बांधून गळफास लावला.

    नागपूर (Nagpur) : चहा मागितल्यानंतर पत्नीने त्याकडे कानाडोळा करीत चहा बनविला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना अंबाझरीत उघडकीस आली. मनोज खुशाल गेडाम (४८, रा. जुना फुटाळा) असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोज गेडामची पहिली पत्नी त्याला सोडून गेली होती. पहिल्या पत्नीपासून त्याला एक मुलगा आहे. त्यानंतर त्याने दुसरे लग्न केले. त्यानंतर त्याचे मानसिक संतूलन बिघडले होते. दरवेळी तो त्याच्या दुसऱ्या पत्नीला ‘मी घरातून निघून जाईल’ अशी धमकी देत होता. त्याचप्रमाणे एप्रिल २०२० मध्ये तो घरून बेपत्ता सुद्धा झाला होता. चार दिवस एका दर्ग्यात राहून तो घरी आला होता.

    रविवारच्या पहाटे ३.३०च्या सुमारास त्याने पत्नीला चहा मागितला. परंतु, झोपेत असलेल्या पत्नीने त्याला चहा दिला नाही. त्यानंतर त्याने लाकडी बल्लीला दोरी बांधून गळफास लावला. सकाळी सव्वासातच्या सुमारास त्याची पत्नी झोपेतून उठली असता तो गळफास लावलेल्या अवस्थेत दिसून आला. याप्रकरणी अंबाझरी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

    दगडाने ठेचून युवकाचा खून
    क्षुल्लक कारणातून झालेल्या वादातून ३५ वर्षीय युवकाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. ही थरारक घटना सोमवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास कुंभारपुरा परिसरात उघडकीस आली. मृत पावलेल्या युवकाची ओळख अद्याप पटलेली नाही. युवकाला दारूचे व्यसन होते. कुंभारपुरा परिसरात त्याचा युवकासोबत वाद झाला. त्याने दगडाने ठेचून ३५ वर्षीय युवकाचे डोके फोडले व पळून गेला. जखमी युवक रक्ताच्या थोराळ्यात खाली पडला. त्याला वेळीच उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला.