होळीपूर्वीच तापमान ३८ अंशावर; विदर्भात उष्णतेचा चढता आलेख

साधारणत: नागपूरसह विदर्भात महाशिवरात्रीनंतर तापमानात हळूहळू वाढ होते आणि होळीपासून उन्हाळ्याला सुरुवात होते. परंतु यावर्षी अपेक्षेप्रमाणे हिवाळ्यात थंडीच पडली नाही. त्यातच मार्चपूर्वीच फेबुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासूनच दररोज तापमान वाढत गेले.

  नागपूर. नुकताच हिवाळा आटोपून उन्हाळ्याची चाहुल लागली आहे. साधारणत: नागपूरसह विदर्भात महाशिवरात्रीनंतर तापमानात हळूहळू वाढ होते आणि होळीपासून उन्हाळ्याला सुरुवात होते. परंतु यावर्षी अपेक्षेप्रमाणे हिवाळ्यात थंडीच पडली नाही. त्यातच मार्चपूर्वीच फेबुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासूनच दररोज तापमान वाढत गेले. आता मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात तापमान ३८ डिग्री सेल्सिअसवर पोहोचले आहे. तसेच उन्हाच्या उष्ण झळांमुळे अंगाची लाही-लाही होऊ लागली आहे. गुरुवारी शहराचे कमाल तापमान सरासरीपेक्षा २.५ डिग्री अधिक ३७.८ डिग्री तर किमान तापमान सरासरीपेक्षा २.१ डिग्री अधिक २१ डिग्री सेल्सिअस नोंदविण्यात आले. गुरुवारी सायंकाळनंतर वातावरणात बदल झाले. रात्री ८.३० वाजेपासून पावसाचे वातावरण निर्माण झाले आणि सुसाट वारा वाहात होता. रात्री उशीरापर्यंत कुठेही पाऊस झाला नसल्याची माहिती आहे. तसेच हवामान विभागाने १२ ते १७ मार्चपर्यंत ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता वर्तविली आहे.

  आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
  तापमानात वाढ होत असल्यामुळे प्रत्येकाने आरोग्याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. गत १५ दिवसांपासून थंडीची तीव्रता कमी होत आहे. मार्चच्या पहिल्याच आठवड्यापासून उन्हाचा तडाखा सुरू झाला आहे. सकाळी १० वाजेपासून ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत उन्हाची तीव्रता कायम राहत आहे. अशातच कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यासोबतच इतर आजारही डोकेवर काढत आहे. त्यामुळे नागरिकांना आरोग्याची जास्त काळजी घ्यावी लागत आहे. घरातील पंखे गरगरू लागले असून, एसी नॉर्मल मोडवर सुरू झाले आहेत.  तर कुलरची दुरुस्ती व रंगरंगोटीही सुरू झाली आहे.

  पावसाची शक्यता
  हवामान विभागानुसार १२ ते १७ मार्चदरम्यान ढगाळ वातावरण राहणार असून यादरम्यान काही भागात मेघगर्जनेसह पावसाच्या हलक्या व मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. तसेच यादरम्यान कमाल तापमान ३५-३८ डिग्री तर किमान तापमान १९-२२ डिग्रीच्या आसपास राहिल. त्यामुळे शेतकऱ्यांनी कापणीवर आलेल्या पिकांची पावसापासून बचाव करण्याची व्यवस्था करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

  महावितरणतर्फे विक्रमी २२३३९ मेगावॉट वीजपुरवठा
  तापमानात वाढ झाल्यामुळे विजेची मागणी प्रचंड वाढली आहे. मंगळवारी नागपूरस विदर्भ आणि संपर्णू राज्यात (मुंबई वगळून) महावितरणने तब्बल २२ हजार ३३९ मेगावॉट विक्रमी वीजपुरवठा केला आहे. मागणीप्रमाणे चोख नियोजनातून वीजपुरवठा करून महावितरणने उच्चांकी वीजपुरवठ्याचा टप्पा गाठला आहे. राज्यात उन्हाच्या झळा दिवसेंदिवस वाढायला सुरवात झाली आहे. सोबतच प्रामुख्याने कृषिपंपांद्वारे विजेचा वापर देखील वाढला आहे. काही दिवसांपासून विजेच्या मागणीत सातत्याने वाढ होत आहे. मात्र मंगळवारी राज्यात मुंबईसह तब्बल २५ हजार २०३ मेगावॉट विजेची उच्चांकी मागणी नोंदविण्यात आली. मुंबई वगळता राज्याच्या उर्वरित कार्यक्षेत्रात महावितरणकडून सुमारे २ कोटी ८० लाख ग्राहकांना आजवरच्या उच्चांकी २२ हजार ३३९ मेगावॉट विजेचा सुरळीत व अखंडित पुरवठा करण्यात आला.