ऐन उन्हाळ्यात एसी आणि कूलरचा व्यवसाय बुडाला; बाजारात कोट्यवधींची उलाढाल ठप्प

कुलर आणि ए.सी. व्यवसायावर राज्यातील संचारबंदीचा विपरीत परिणाम झालेला जाणवत आहे. ग्राहकांकडून मालाला मागणीच नसल्याने व्यावसायिक चिंतेत सापडले आहेत. एसी, कूलर, फ्रीज, वॉशिंग मशीन यांना भरपूर मागणी आहे. याशिवाय घरातील पंखे, फ्रीज, एसी वा कूलर नादुरुस्त झाला तरी त्यांच्या दुरुस्तीचे काम करणारे तांत्रिक कारागीर मिळणे अवघड झाले आहे.

    नागपूर (Nagpur).  कुलर आणि ए.सी. व्यवसायावर राज्यातील संचारबंदीचा विपरीत परिणाम झालेला जाणवत आहे. ग्राहकांकडून मालाला मागणीच नसल्याने व्यावसायिक चिंतेत सापडले आहेत. एसी, कूलर, फ्रीज, वॉशिंग मशीन यांना भरपूर मागणी आहे. याशिवाय घरातील पंखे, फ्रीज, एसी वा कूलर नादुरुस्त झाला तरी त्यांच्या दुरुस्तीचे काम करणारे तांत्रिक कारागीर मिळणे अवघड झाले आहे. कारागीर मिळाला तरी खराब झालेले सामान मिळत नसल्याची स्थिती आहे. यामुळे शहरातील एसी आणि कूलरचा व्यवसाय ८० ते ८५ टक्के ठप्प झाला आहे.

    मागील महिन्याभरापासून बाजारपेठ बंद असल्याने ग्राहकांची मागणी असली, तरी पुरवठा करणे विक्रेत्यांना अवघड झाले आहे. तयार असलेले कूलर कंपन्यांमध्ये, दुकानांमध्ये पडून आहेत. शहर व परिसरातून दरवर्षी सुमारे दीड लाख कूलरची तर ७० ते ८० हजार एसीची विक्री होते. कूलर उद्योगावर अडीच ते तीन हजार कुटुंबे अवलंबून आहेत.

    मार्चच्या शेवटी कूलरची खरेदी वा जुन्याची डागडुजी केली जाते. खसताट्या बदल, वाइंडिंग काम व अन्य दुरुस्ती कामे केली जातात. अक्षयतृतीया, गुढीपाडवा, रामनवमीसह इतरही मुहूर्तावर नवे एसी, कूलर, फ्रीज, वॉशिंग मशीनसारख्या इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांची खरेदीही होते. त्यामुळे मार्च व एप्रिल महिन्यात या व्यवसायात लाखोंची उलाढाल होते. यंदा सलग दुसऱ्या वर्षी कोरोनामुळे हा व्यवसाय थंड पडला आहे.

    विदर्भात सर्वाधिक कूलरची विक्री होते. अडीच ते पाच हजारांपर्यंत त्यांची किंमत असते. परंतु, लॉकडाउन जाहीर झाल्याने शहरातील बाजारपेठा बंद आहेत. व्यवसाय ठप्प असल्याने त्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. उन्हाळ्यामध्ये कूलर व्यवसायात कोट्यवधीची उलाढाल होते. परंतु, सध्या सर्व अपेक्षांवर पाणी पडले आहे. आता टाळेबंदी ३१ मेपर्यंत वाढवली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस व्यावसायिकांची चिंता वाढत आहे.