पोलीस उपनिरीक्षक होण्याचे स्वप्न अद्यापही अपूर्णच; १५३३ उमेदवारांची नियुक्ती तीन वर्षांपासून रखडली

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे (the Maharashtra Public Service Commission) (MPSC) २०१८ ते २०२० या तीन वर्षांत १५३३ पोलीस उपनिरीक्षक पदांसाठी (police sub inspector) राबवण्यात आलेल्या भरती प्रक्रियेमधून अद्याप एकाही उमेदवाराला नियुक्ती मिळाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

    नागपूर (Nagpur).  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे (the Maharashtra Public Service Commission) (MPSC) २०१८ ते २०२० या तीन वर्षांत १५३३ पोलीस उपनिरीक्षक पदांसाठी (police sub inspector) राबवण्यात आलेल्या भरती प्रक्रियेमधून अद्याप एकाही उमेदवाराला नियुक्ती मिळाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

    २०१७च्या परीक्षेतील ३२२ उमेदवारांना चार वर्षांनंतर म्हणजे जून २०२१ पासून नाशिक येथे प्रशिक्षणासाठी बोलावण्यात आले आहे. यावरून परीक्षा उत्तीर्ण झालेल्या शेकडो उमेदवारांना शासकीय दिरंगाईमुळे किती तिष्ठत राहावे लागते, हे स्पष्ट होते. माहिती अधिकार कार्यकर्ते सूरज गुज्जलवार यांनी राज्य शासनाच्या गृह विभागाकडून पोलीस उपनिरीक्षक पदासंदर्भात मागितलेल्या माहितीमधून हे सत्य उजेडात आले आहे. राज्यात अनेक वर्षांपासून पोलीस भरती झालेली नाही.

    त्यातच पोलीस उपनिरीक्षकांची निवड होऊनही अनेक पदे रिक्त आहेत. गृह विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ‘एमपीएससी’मार्फत सरळसेवा परीक्षा २०१८ मधून ३८७, २०१९ मधून ४९६ आणि २०२०मधून ६५० जागा भरण्याची कार्यवाही सुरू आहे. ही एकूण १५३३ पदे असून यातील काही पदांची पूर्वपरीक्षा झाली आहे, काहींची शारीरिक चाचणी बाकी आहे. काहीजण प्रक्रिया पूर्ण होऊनही नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. तीन वर्षांपासून परीक्षा देऊनही भरती होत नसल्याने आता शासन आणि आयोगाच्या विरोधात आंदोलने उभारली जात आहेत.

    राज्यातील २४६६ पदे रिक्त
    राज्य शासनाच्या इतर विभागांप्रमाणे गृह विभागातीलही अनेक अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याची माहिती अधिकारातून उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, पोलीस उपनिरीक्षकाच्या १५३३ पदांना अद्याप नियुक्ती मिळाली नाही हे वास्तव असतानाच याव्यतिरिक्त सद्य:स्थितीत पोलीस उपनिरीक्षकाची २४६६ पदेही रिक्त आहेत. त्यामुळे सरकार २०१८ पासूनच्या उमेदवारांना अद्याप नियुक्ती देत नसेल तर उर्वरित रिक्त पदे कधी भरली जाणार, हा गंभीर प्रश्न या माहितीतून उपस्थित झाला आहे.