कारचालकांची स्टंटबाजी आली अंगलट; पोलिसांकडून दंडुक्यांचा प्रसाद आणि बेड्या; ‘स्टंटबाजी’चे कारण जाणून पोलिसही चक्रावले

120 ते 150 च्या वेगाने हायस्पीड बाईक वा कार पळविण्याचा आसुरी आनंद घेतल्याशिवाय त्यांना चैन पडेना! पण रस्त्यांवरील अशा आगाऊ स्टंटबाजांच्या उचापतींवर वाहतूक पोलिसांची करडी नजर असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. नागपूर पोलिसांनी अलीकडेच भरधाव कारने स्टंटबाजी करणाऱ्या 4 जणांना पकडून चांगलेच बदडून काढले

    नागपूर (Nagpur) : शहरातील गुळगुळीत सिमेंटचे रस्ते आणि तुरळक रहदारी काही स्टंटबाजांसाठी मोकळे रान ठरत आहे. 120 ते 150 च्या वेगाने हायस्पीड बाईक वा कार पळविण्याचा आसुरी आनंद घेतल्याशिवाय त्यांना चैन पडेना! पण रस्त्यांवरील अशा आगाऊ स्टंटबाजांच्या उचापतींवर वाहतूक पोलिसांची करडी नजर असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. नागपूर पोलिसांनी अलीकडेच भरधाव कारने स्टंटबाजी करणाऱ्या 4 जणांना पकडून चांगलेच बदडून काढले आणि त्यांच्या हातात बेड्याही ठोकल्या.

    वेगवान कारच्या साहाय्याने स्टंटबाजी करण्याचे नेमके कारण काय? हे जाणून पोलिसही चक्रावून गेले. सोशल मीडियावर फॉलोअर्सची संख्या वाढविण्यासाठी आपण या सगळ्या उचापती करायचो अशी कबुलीच या चौघांनी पोलिसांना दिली. हे जाणून असल्या बेजबाबदार तरुणांना कठोर शिक्षा देण्याची तयारी नागपूर पोलिसांनी केली आहे. विशेष म्हणून अटक करण्यात आलेल्या स्टंटबाजांच्या जिगरी दोस्तांना पोलिसी कारवाईची माहिती कळताच ते फरार झाले आहेत.
    त्यांच्या या स्टंटमुळे त्यांच्या स्वत:सह इतरांचा पण जीव धोक्यात येतो. या संदर्भात नागपूर वाहतूक पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या तरुणांचे नाव मोहनिस अहमद, विक्की जागडे, मोहनिस खान व अहमद पिजारे अशी आहेत. पोलिसांनी या आरपींकडून स्टंटसाठी वापरलेली वाहने सुद्धा जप्त करण्यात आली आहेत.

    सोशल मीडियात आपले फॉलोअर्स वाढावेत म्हणून हे तरुण अशा प्रकारचे स्टंट करत असल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं आहे. या तरुणांच्याकडील मोबाइल फोनमध्ये इतरही ठिकाणी स्टंटबाजी केल्याचे व्हिडीओ पोलिसांना आढळून आले आहेत. या तरुणांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे. अटक करण्यात आलेले हे सर्व आरोपी 25 वर्षांखालील आहेत.