कार अपघातात जीव गमावलेल्या तीन नातवंडांसह आजोबाचा अंत्यसंस्कार

सोमवारी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास नागपूरवरून शवविच्छेदन करून आजोबा, नातू व एका चिमुकलीचा मृतदेह सातनवरी गावात येताच गावकऱ्यांचे अश्रू अनावर झाले होते. पोलिसांच्या उपस्थितीत चारही मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. गाव शोकमग्न झाल्याने एकाही चूल पेटली नाही.

  बाजारगाव (Bazargaon) : रविवारी घडलेल्या विचित्र अपघातात एकाच कुटुंबातील आजोबासह तीन नातवंडांचा दुर्दैवी मृत्यू झाला. शोकाकूल वातावरणात आजोबा व तीन चिमुकल्यांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. शाळेची लगबग व मामाचे साक्षगंध कुटुंबाला दुःखाच्या सागरात लोटून गेले.

  आजपासून शाळा सुरू होणार म्हणून आजोबा बंडू ऊर्फ गौतम साळवनकर मुलीच्या मुलांना शौर्य सुबोध डोंगरे (९), शिरली सुबोध डोंगरे (६) यांना व कुटुंबातील चिनू विनोद सोनबरसे (१३) यांना सोबत घेऊन मुलीच्या गावी इसापूर (ता. मौदा) येथे पोहोचून देण्यासाठी मोठ्या लगबगीने घरून सातनवरी बसस्थानकावर आले. नागपूरला जाण्यासाठी रस्त्याच्या कडेला असलेल्या दुभाजकावर बसले.Bajar

  महामार्गावर असलेला खड्डा वाचविण्याच्या प्रयत्नात काळरुपी कार अनियंत्रित होऊन त्यांना चिरडत गेली. याच आजोबा व नातवंडाचा मृत्यू झाला. ललिता बाबूलाल सोनबरसे (५०, रा. सातनवरी) ही मृत्यूशी झुंज देत आहे. सोमवारी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास नागपूरवरून शवविच्छेदन करून आजोबा, नातू व एका चिमुकलीचा मृतदेह सातनवरी गावात येताच गावकऱ्यांचे अश्रू अनावर झाले होते.

  दोन नातवंडे व आजोबा यांचे त्यांच्या घरून तर चौथा मृतदेह चिनू विनोद सोनबरसे या बालकाच्या घरी नेण्यात आला. पोलिसांच्या उपस्थितीत चारही मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. गाव शोकमग्न झाल्याने एकाही चूल पेटली नाही.

  चिमुकल्यांची आई-वडील सुन्न
  शौर्य व शिरली या बहीण-भावांचा कार दुर्घटनेत मृत्यू झाला. शौर्य व शिरली हे लहान असतानाच मातेचे छत्र हरवले. वडिलांनी दुसरे लग्न थाटले. परंतु, दुसऱ्या मातेचे प्रेम सुबोधला मिळाले नाही. परिणाम असा झाला की सुबोधला घर सोडावे लागले. सुबोधने बाहेर कामे करून स्वतःचा संसार थाटला. त्यात मातेच्या रूपात शिरली (६) तर पित्याच्या रूपामध्ये शौर्य जन्माला आले, असे ते समजत होते. तेव्हापासूनच सुबोध मुलांमध्येच आई-वडिलांना पाहत होता. मुलांच्या मृत्यूने सुबोध व पत्नी सोनाली हे पुरते खचून गेले. न राहवल्याने दोघही धाय मोकलून रडत होते. शून्य नजरेने मुलांच्या मृतदेह पाहून सुन्न झाले होते.