विदर्भातील कोरोनाविरूद्धच्या लढ्याच्या सज्जतेसाठी डॉ. नितीन राऊत यांनी घेतला पुढाकार

विदर्भात सुमारे अडीच कोटी जनता असून त्यापैकी जवळपास ९५ लाख लोकांचे लसीकरण झाले आहे. यापैकी केवळ २४.५० लाख लोकांना लशींच्या दोन्ही मात्रा देण्यात आल्या आहेत. तिस-या लाटेला रोखायचे असेल तर त्यासाठी सर्वांचे लवकरात लवकर लसीकरण होणे गरजेचे आहे. - डॉ. नितीन राऊत

  नागपूर (Nagpur) : कोरोनाच्या (corona) तिस-या लाटेचा मुकाबला करण्यासाठी विदर्भाला सर्व दृष्टीने सज्ज करण्यासाठी राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत (The State’s Energy Minister Dr. Nitin Raut) यांनी कंबर कसली आहे. शक्यतो तिस-या लाटेला विदर्भात (Vidarbha) येऊच द्यायचे नाही, या ध्येयाने वेगवान लसीकरण व्हावे यासाठी तर डॉ. राऊत यांनी विशेष मोहीमच उघडली आहे.

  डॉ. राऊत हे नागपूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व पालकमंत्री असले तरी त्यांनी नेहमीच विदर्भाचा प्राधान्याने विचार केला आहे. कोरोनाविरूद्धच्या आजवरच्या लढाईत त्यांनी विदर्भासाठी केलेल्या उपाययोजना आणि लसीकरणासाठी केलेले व्यापक नियोजन पाहता डॉ. राऊत हे आता कोरोनाविरूद्धच्या लढ्याचे सरसेनापती झाले असल्याचे स्पष्ट दिसते.

  डॉ. राऊत हे राजकारणात आल्यापासून विशेषतः विधिमंडळात आल्यापासून विदर्भाचे नेते म्हणून ओळखले जातात. काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार असताना मंत्रिमंडळात विदर्भाच्या प्रश्नांवर त्यांनी वेळोवेळी आक्रमक भूमिका घेतल्याचेही विदर्भातील जनतेने पाहिले आहे. विदर्भाच्या विकासासाठी, विदर्भावर अन्याय होऊ नये म्हणून आग्रही भूमिका घेणारे नेते म्हणूनही डॉ. राऊत ओळखले जातात. याच भूमिकेतून त्यांनी कोरोनाविरूद्ध लढाईत विदर्भ अग्रेसर रहावा,यासाठी नियोजन केले आहे.

  दुस-या लाटेतही त्यांनी नागपूर व अकोला जिल्ह्यात हवेतून ऑक्सिजन निर्मितीची व्यवस्था उर्जा विभागाच्या महानिर्मिती कंपनीच्या माध्यमातून केली आहे. नागपूरसह विदर्भात तिस-या लाटेचे संकट ओढवल्यास ऑक्सिजनची कमतरता जाणवणार नाही, असे नियोजन केले आहे.

  विदर्भात सुमारे अडीच कोटी जनता असून त्यापैकी जवळपास ९५ लाख लोकांचे लसीकरण झाले आहे. यापैकी केवळ २४.५० लाख लोकांना लशींच्या दोन्ही मात्रा देण्यात आल्या आहेत. तिस-या लाटेला रोखायचे असेल तर त्यासाठी सर्वांचे लवकरात लवकर लसीकरण होणे गरजेचे आहे. त्यासाठी डॉ. राऊत यांनी पुढाकार घेतला आहे. माहितीच्या अभावी, शारिरिक स्थितीमुळे वा अंथरूणाला खिळलेले असल्याने विदर्भात अनेक जण लसीकरण केंद्रांवर पोहोचू शकलेले नाही. विदर्भात मोठा भूभाग हा ग्रामीण आहे. आदिवासीबहुल दुर्गम भागही मोठ्या प्रमाणावर आहे. अशा स्थितीत वेगाने लसीकरण होण्यात अनेक आव्हाने आहेत.

  या आव्हानांवर मात करण्यासाठी विदर्भातील ११ जिल्ह्यांत २०० वाहनांच्या माध्यमातून लसीकरणाची धडक मोहीम राबविण्याचा संकल्पच डॉ. राऊत यांनी केला आहे. ऊर्जा मंत्री या नात्याने त्यांनी महापारेषण या ऊर्जा विभागांतर्गत कंपनीच्या सामाजिक दायित्व निधी(सी.एस.आर.)तून २५ कोटी खर्च करून २०० लसीकरण वाहने नागपूर व अमरावती विभागांना भेट देण्याचा निर्णय घेतला आहे.

  शुक्रवार दि. २० ऑगस्ट रोजी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त सदभावना दिनी नागपूर येथील मानकापूर स्टेडियमवर आयोजित एका भव्य कार्यक्रमात ही लसीकरण वाहने (जीवन रथ) प्रशासनाला सोपवली जात आहेत. यानंतर ही वाहने विदर्भातील प्रत्येक तालुक्याला सोपविली जातील. नागपूर व अमरावती विभागीय आयुक्त यांच्या देखरेखीखाली विदर्भातील १२० तालुक्यात ही लसीकरण वाहने गरजूंच्या लसीकरणासाठी तालुका प्राथमिक आरोग्य केंद्रात तैनात होणार आहेत. गर्भवती स्त्रिया, ज्येष्ठ नागरिक, अंथरूणाला खिळलेले रूग्ण, दिव्यांग व्यक्ती यांच्या घरी जाऊन लसीकरणासाठी तसेच आकस्मिक व आपत्कालिन परिस्थितीत आरोग्य केंद्रांच्या वैद्यकीय चमूस रूग्णापर्यंत पोहोचण्यासाठी ही लसीकरण वाहने उपयुक्त ठरणार आहेत.