अमरावती- नागपूर महामार्गावर भीषण अपघात; दोन जणांचा मृत्यू , तर दोन शेतकरी गंभीर जखमी

जनावरांसाठी शेतातुन चारा आणण्यासाठी ट्रॅक्टरने तिवसा येथील शेतात निघालेल्या ट्रॅक्टरला भरधाव ट्रकने मागून धडक दिल्याने दोन शेतकऱ्यांचा घटनास्थळीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना आज सकाळी ६ वाजताच्या दरम्यान अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर शिवनगाव जवळ घडली.

    अमरावती: अमरावती- नागपूर महामार्गावर ट्रक आणि ट्रँक्टरचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना आज (शनिवार) सकाळच्या सुमारास घडली. जनावरांसाठी शेतातुन चारा आणण्यासाठी ट्रॅक्टरने तिवसा येथील शेतात निघालेल्या ट्रॅक्टरला भरधाव ट्रकने मागून धडक दिल्याने दोन शेतकऱ्यांचा घटनास्थळीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना आज सकाळी ६ वाजताच्या दरम्यान अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर शिवनगाव जवळ घडली. यात दोन शेतकरी गंभीर जखमी सुद्धा झाले आहेत.

    मिळालेल्या माहितीनुसार, कैलास हुंडीवाले वय ४० वर्ष व हुंडाआप्पा बहीहट वय ५५ असे घटनास्थळीच मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. तर संजय दिवटे व मुकेश बिरकट असे अपघातात गंभीर जखमी झालेल्या शेतकऱ्यांचे नाव आहेत. या अपघातात शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरला धडक देणारा ट्रॅक चालक ट्रक घेऊन अपघात नंतर घटनास्थळ वरून पसार झाला आहे.

    दरम्यान, अपघातानंतर राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. तर पुढील तपास नांदगावपेठ पोलीस करीत आहेत. दोन जखमीवर अमरावती जिल्हा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे.