आंघोळ करायला नदीत उतरले आणि खोल पाण्यात बुडाले; पारशिवनी तालुक्यातील घटना

दिग्रस तालुक्यातून सुमारे १० जण अम्माची दर्गा या ठिकाणी होत असलेल्या उर्समध्ये सहभागी होण्यासाठी आले होते. त्यापैकीच पाच जण आज सकाळी नदीत बुडाल्याची माहिती आहे.

    नागपूर (Nagpur) : जिल्ह्यातील कन्हान येथे कन्हान नदीच्या काठावर असलेल्या “अम्माची दर्गा” या ठिकाणी पाच तरुण बुडाले आहेत. मिळालेल्या माहितीप्रमाणे यवतमाळमधील दिग्रस तालुक्यातून सुमारे १० जण अम्माची दर्गा या ठिकाणी होत असलेल्या उर्समध्ये सहभागी होण्यासाठी आले होते. त्यापैकीच पाच जण आज सकाळी नदीत बुडाल्याची माहिती आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे हे सर्वजण सकाळी आंघोळ करायला नदीत उतरले. मात्र खोलीचा अंदाज न आल्यामुळे पाच जण बुडाले आहेत.

    स्थानिक पथकामार्फत शोध कार्य सुरू आहे. मात्र नदीचा प्रवाह जास्त असल्याने बचावकार्यात अडचणी येत आहेत. पारशिवणीचे तहसीलदार प्रशांत सांगडे यांनी ‘एसडीआरएफ’ पथकाची मागणी केलेली आहे. मृत तरुणांची ओळख पटली असून सय्यद अरबाज (२१), ख्वाजा बेग (१९), सप्तहीन शेख (२०), अय्याज बेग (२२), मो आखुजर (२१) अशी त्यांची नावं आहे. हे पाचही युवक दिग्रस येथील आहेत.