नागपूरच्या दोन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएस इंटर्न डॉक्टर्सचा संपाचा इशारा, मागण्या काय आहेत ? : वाचा सविस्तर

पुण्यातील इंटर्न डॉक्टर्सला कोविड कामांसाठी वेगळे मानधन देण्यात आले होते. तसेच मानधन नागपुरात त्यानांही देण्यात यावे, अशी मुख्य मागणी या डॉक्टरांनी केली आहे.

  नागपूर : नागपुरातील शासकीय वैद्यकीय रुग्णालय म्हणजेच जीएमसी आणि इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय रुग्णालय म्हणजेच मेयो या दोन वैद्यकीय महाविद्यालयातील सुमारे साडे तीनशे एमबीबीएस इंटर्न डॉक्टरांनी इंटर्न म्हणून कोविड वार्डात काम करण्यास नकार दिला आहे. या दोन्ही वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएस इंटर्न डॉक्टरांनी उद्यापासून संपावर जाण्याचा इशारा दिला आहे.

  दरम्यान गेल्या वर्षी कोरोना काळात ज्या प्रमाणे मुंबई आणि पुण्यातील इंटर्न डॉक्टर्सला कोविड कामांसाठी वेगळे मानधन देण्यात आले होते. तसेच मानधन नागपुरात त्यानांही देण्यात यावे, अशी मुख्य मागणी या डॉक्टरांनी केली आहे. जोपर्यंत कोविड कामांसाठी स्वतंत्र मानधन देण्याचे प्रशासन मान्य करत नाही. तोपर्यंत संपावर राहण्याचा इशारा जीएमसीच्या 200 आणि मेयोच्या 150 इंटर्न डॉक्टरांनी ने दिला आहे.

  याबाबत अधिष्ठाता, नागपूर महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना सप्टेंबर 2020 मध्ये निवेदन देण्यात आले आहे. मात्र त्यावर काही कारवाई करण्यात आली नाही. उद्या पुन्हा निवेदन देणार असून जोपर्यंत आम्हाला लेखी आश्वासन आम्हला मिळत नाही, तोपर्यंत आम्ही संप मागे न घेता आंदोलन चालू ठेवणार असल्याची भूमिका इंटर्न डॉक्टरांनी घेतील आहे. नागपूर कोरोनाची स्थिती गंभीर आहे. अशातचं जर उद्या सकाळपासून दोन्ही वैद्यकीय महाविद्यालयातील इंटर्न डॉक्टर संपावर गेल्यास जीएमसी आणि मेयो या दोन्ही सरकारी रुग्णालयात कोविड रुग्णसेवा कोलमडण्याची भीती आहे.

  इंटर्न डॉक्टरांच्या मागण्या काय आहेत ?

  • मुंबई आणि पुण्याच्या इंटर्न डॉक्टरांप्रमाणे राज्यातील सर्व इंटर्न डॉक्टरांना 50 हजारांचं मानधन द्यावे.
  • मुंबई आणि पुण्याच्या इंटर्न डॉक्टरांप्रमाणे 300 रु प्रतिदिन जेवण, प्रवास प्रोत्साहन भत्ता मंजूर करावा.
  • कोविड सेंटरमधील ड्युटीनंतर विलगीकरणाची व्यवस्था करावी. त्याकाळात आजारी पडल्यास उपचाराची जबाबदारी शासनाने उचलावी.
  • शासनाने इंटर्न डॉक्टर्सना विमा कवच प्रदान करावे.
  • तसेच नर्सेस विद्यार्थ्यानं शासन एक हजार रुपये भत्ता दर दिवसाला देत असून महाराष्ट्रातील इंटर्न डॉक्टरांना सद्यस्थितीला कोणताही भत्ता न मिळता केवळ तुटपुंज्या विद्यावेतन वर काम करावे लागत आहे.