केंद्राकडून ओबीसींचा इम्पिरिकल डेटा मिळावा म्हणून सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करणार; विजय वडेट्टीवार यांची माहिती

ओबीसी आरक्षणासाठी महत्वाचा इम्पिरिकल डेटा गोळा करण्याचे काम आयोगाला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, कोरोनाच्या संकटामध्ये हा डेटा उपलब्ध होण्यात अडचणी आहेत. त्यामुळे केंद्राकडून डेटा मिळावा म्हणून आम्ही कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करणार आहोत. न्यायालयात केंद्राला डेटा देण्याचे आदेश देण्याची विनंती करणार आहोत. तसेच कोरोना संकटात डेटा कसा गोळा करता येईल याबाबत न्यायालयाचे मतही जाणून घेणार आहोत असे वडेट्टीवार म्हणाले.

    नागपूर : केंद्र सरकारकडे ओबीसींचा इम्पिरिकल डेटा आहे. हा डेटा मिळाला तर ओबीसींच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा होवू शकतो. त्यामुळे केंद्राकडून हा डेटा मिळवण्यासाठी आम्ही सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहोत अशी माहिती राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

    कोरोना संकटात डेटा कसा गोळा करता येईल

    ओबीसी आरक्षणासाठी महत्वाचा इम्पिरिकल डेटा गोळा करण्याचे काम आयोगाला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, कोरोनाच्या संकटामध्ये हा डेटा उपलब्ध होण्यात अडचणी आहेत. त्यामुळे केंद्राकडून डेटा मिळावा म्हणून आम्ही कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करणार आहोत. न्यायालयात केंद्राला डेटा देण्याचे आदेश देण्याची विनंती करणार आहोत. तसेच कोरोना संकटात डेटा कसा गोळा करता येईल याबाबत न्यायालयाचे मतही जाणून घेणार आहोत असे वडेट्टीवार म्हणाले.

    इम्पिरिकल डेटा बाबत पंतप्रधानांना विनंती

    ते म्हणाले की, ओबीसींचा इम्पिरिकल डेटा मिळावा म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांनीही इम्पिरिकल डेटा बाबत पंतप्रधानांना विनंती केली आहे. या शिवाय केंद्राला दोन पत्र पाठविण्यात आली आहेत. पण डेटा मिळाला नाही. हा डेटा मिळाला नसल्याने सहकार क्षेत्रापासून ते स्थानिक स्वराज्य संस्थेपर्यंतच्या अनेक निवडणुकांधील ४० ते ५० हजार जागांवर प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळेच आम्ही सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.

    २६ आणि २७ जून रोजी चिंतन बैठक

    दरम्यान, ओबीसी आरक्षणातील अडथळे कोणते आहेत? ते कसे दूर करता येतील? त्यावर काय उपाय आहेत? याबाबत चिंतन करण्यासाठी विजय वडेट्टीवार यांनी लोणावळ्यात एका शिबीराचे आयोजन केले आहे. लोणावळ्यात येत्या २६ आणि २७ जून रोजी चिंतन बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या दोन दिवसीय शिबिराचे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ उद्घाटन करणार आहेत. या शिबिराला पंकजा मुंडे, नाना पटोले आणि संजय राठोड यांनाही निमंत्रित करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

    कोणतीही राजकीय भूमिका नाही

    ओबीसींच्या प्रश्नावर पक्षापलिकडे जाऊन गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. या शिबिर बोलावण्यामागे राजकारण नाही किंवा कोणतीही राजकीय भूमिका नाही. तसे असते तर मी सर्वपक्षीय नेत्यांना बोलावले नसते. मी कोणत्याही संघटनेत नाही. समाजाचा घटक आणि कार्यकर्ता म्हणून ओबीसी आरक्षणावर लढत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.