भय इथले संपत नाही, कोरोनाच्या भीतीने मजूर पुन्हा चालले गावी, पुन्हा पायपीट सुरू

हे मजूर शेकडो मैल अंतर कापून जाणार आहेत. त्यांच्याकडे ना पैसा आहे, ना मास्क, ना सॅनिटायझर. एकत्र जथ्याजथ्याने जात असल्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचाही पत्ता नाही. आहे ती केवळ भीती. कोरोनापेक्षाही मोठी भीती. पोटाची. भूकेची. 

    कोरोनाची दुसरी लाट पहिल्या लाटेच्या भीषण आठवणी जागृत करत आहे. गेल्या वर्षी कोरोनाचा कहर आणि त्यानंतर लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर परराज्यातले हजारो मजूर अडकून पडले होते. कुठलंही वाहन मिळत नसल्यामुळे त्यांनी चालतच आपलं गाव गाठण्याचा निर्णय घेतला होता. आता पुन्हा एकदा लॉकडाऊन झाल्यामुळे नागपूर परिसरातील मजुरांनी पुन्हा आपापल्या राज्यात परतायला सुरुवात केली आहे.

    नागपूरमध्ये मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमधून हजारो कामगार रोजगाराच्या शोधात येत असतात. पण नागपूरमध्ये अचानक कोरोनाच्या केेसेस वाढायला सुरुवात झाल्यामुळे ३१ मार्चपर्यंत लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे अचानक या कामगारांच्या पोटपाण्याचा व्यवसाय बंद झालाय. त्यात मध्यप्रदेश परिवहन महामंडळानं महाराष्ट्रातून होणारी एसटी वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे कामगारांचे धाबे दणाणलेत.

    नागपूर आणि आजूबाजूच्या परिसरातून शेकडो कामगारांनी आता घराची वाट धरलीय. २१ मार्चपासून मध्यप्रदेश प्रशासनानं महाराष्ट्रातील वाहतूक बंद केलीय. त्यामुळे इतर काही वाहन उपलब्ध होईल की नाही, याची कुठलीही शाश्वती कामगारांना वाटेनाशी झालीय. त्यांनी नागपूर-जबलपूर मार्गावरून पायी प्रवास सुरू केला असून मजुरांचे जथ्थे मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमधल्या आपल्या गावी परतत असल्याचं चित्र सध्या रस्तोरस्ती दिसू लागलंय.

    हे मजूर शेकडो मैल अंतर कापून जाणार आहेत. त्यांच्याकडे ना पैसा आहे, ना मास्क, ना सॅनिटायझर. एकत्र जथ्याजथ्याने जात असल्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचाही पत्ता नाही. आहे ती केवळ भीती. कोरोनापेक्षाही मोठी भीती. पोटाची. भूकेची.