मराठा व ओबीसींबाबत दुटप्पीपणामुळे भाजपला फटका – अशोक चव्हाण

सार्वजनिकरित्या बोलताना ओबीसींचे तारणहार आम्हीच, मराठ्यांचे तारणहार आम्हीच, अशी भूमिका घ्यायची आणि प्रत्यक्ष निर्णय घेण्याची वेळ आल्यावर नामनिराळे राहण्याचे भाजपचे धोरण मतदारांच्या लक्षात आले असून, त्यांनी मतदानातून नाराजी व्यक्त केली

    नांदेड: मराठा आरक्षण व ओबीसी राजकीय आरक्षणाबाबत दुटप्पी भूमिका घेतल्याने जिल्हा परिषद व पंचायत समिती पोटनिवडणुकीत भाजपला मोठा फटका बसल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

    आजच्या निकालांवर प्रतिक्रिया व्यक्त करताना त्यांनी काँग्रेसच्या जागांमध्ये वाढ झाल्याबद्दल संबंधित जिल्ह्यातील पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. चव्हाण म्हणाले की, जिल्हा परिषदेच्या रिक्त झालेल्या ८५ जागांमध्ये काँग्रेसच्या १३ जागा होत्या. मात्र, यावेळी १७ जागा निवडून आल्या आहे. महाविकास आघाडीचा विचार करता रिक्त झालेल्या ३७ जागांच्या तुलनेत वेगवेगळे लढूनही यावेळी ४६ जागा निवडून आल्या आहेत. दुसरीकडे भाजप ३१ जागांवरून २३ वर घसरली असून, वंचित बहुजन आघाडीच्या १२ जागांची संख्या ८ वर आली आहे.

    मराठा आरक्षण असो वा ओबीसींचे राजकीय आरक्षण, दरवेळी भाजपने दुटप्पी भूमिका घेतली. केंद्रातील त्यांच्या सरकारला ही दोन्ही आरक्षणे कायम ठेवण्यासाठी निर्णायक भूमिका बजावण्याची संधी असताना त्यांनी योग्य ते निर्णय घेतले नाहीत. सार्वजनिकरित्या बोलताना ओबीसींचे तारणहार आम्हीच, मराठ्यांचे तारणहार आम्हीच, अशी भूमिका घ्यायची आणि प्रत्यक्ष निर्णय घेण्याची वेळ आल्यावर नामनिराळे राहण्याचे भाजपचे धोरण मतदारांच्या लक्षात आले असून, त्यांनी मतदानातून नाराजी व्यक्त केल्याचे अशोक चव्हाण म्हणाले.