कुटुंबियांच्या विरोधामुळे घेतला टोकाचा निर्णय, प्रेमी युगूलाने झाडाला दोरीने गळफास घेऊन केली आत्महत्या

कामारवाडी येथील प्रेमी युगूलाने लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या(Couple Suicide) केली आहे.

    नांदेड : हिमायतनगर तालुक्यातील कामारवाडी येथील प्रेमी युगूलाने लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या(Couple Suicide) केली आहे. हिमायतनगर तालुक्यातील कामारवाडी येथील दत्ता याचे विवाहिता शारदावर प्रेम होते.

    नवर्‍याशी पटत नसल्याने शारदा ४ वर्षांपासून मामाकडेच कामारवाडी येथे वास्तव्यास होती. दरम्यान काही दिवसांपासून त्यांच्या नातेवाईकांना दोघांच्या प्रेमाची कुणकुण लागली होती. शारदा विवाहीत असल्याने दत्ताच्या घरच्यांनी दोघांच्या प्रेम संबंधाला विरोध दर्शविला. तसेच दत्ताचे लग्न ठरवले.  दत्ताचे लग्न झाले तर दोघांना एकमेकांपासून दूर व्हावं लागणार असल्याने, दोघांनीही टोकाचा निर्णय घेत शनिवारी पहाटे गावाशेजारील एका शेतातील लिंबाच्या झाडाला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

    ही घटना उघडकीस आल्यानंतर कामारवाडी गावचे पोलीस पाटील नागोराव भिंगोरे यांनी हिमायतनगर पोलिसांना याबाबत कळविल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले.